शिक्षणातला सद्गगुण म्हणजे नीती आणि चारित्र्य होय - डॉ. प्रकाश पवार, 'यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2023

शिक्षणातला सद्गगुण म्हणजे नीती आणि चारित्र्य होय - डॉ. प्रकाश पवार, 'यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         "समाजाला केंद्रस्थानी ठेवून आणि एम. एन. रॉय यांना गुरु मानून यशवंतराव चव्हाणांनी कार्य केले. वैचारिक क्रांती करताना राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचा प्रभाव होता. जन समूहातील 'बहुजनवाद' यशवंतराव चव्हाण  यांच्या नजरेसमोर होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला आधुनिक करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श होता. विज्ञानातून  आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण व्हावी, ही भूमिका त्यांनी मांडली. विज्ञानाला 'माणूस' बनवण्याच काम त्यांनी केले. भारतीय संस्कृतीत बहुलतेतून एकता घडवण्याचे त्यांचे ध्येय होते. शिक्षणातला सद्गुण म्हणजे नीती आणि चारित्र्य होय." असे प्रतिपादन डॉ. प्रकाश पवार यांनी केले. दौलत विश्वस्त संस्थेचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता.चंदगड) येथे एक दिवशीय 'यशवंतराव चव्हाण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार' या विषयावरील राष्ट्रीय  परिसंवादात बीजभाषक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते. 

          यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील, डॉ. अरुण भोसले, डॉ. आय. एच. पठाण, डॉ. चंद्रवर्धन नाईक, प्राचार्य डॉ. बी डी अजळकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी.डी. अजळकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय समन्वयक डॉ. जे. जे. व्हटकर यांनी करून दिला.दुसऱ्या सत्रात डॉ. अरुण भोसले म्हणाले,  'समाजाची वैचारिक क्रांती घडावी ही तळमळ यशवंतराव चव्हाण यांची होती. पक्षीय दृष्टिकोनापेक्षा सामान्य माणसाला न्याय देण्यासाठीची योग्यता आणि गुणवत्ता फक्त यशवंतराव चव्हाण यांच्यात होती. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले.'

     तिसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. आय. एच. पठाण म्हणाले, 'शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा होता. शिक्षणाची आस्था असलेला नेता होता. सैनिक स्कूलची स्थापना शाळेविषयीची आस्था या गोष्टी फार महत्त्वाच्या मानून कार्यरत राहिले. लष्कराची पाळेमुळे त्यांच्या शिक्षण प्रसारात होती. यशवंतराव चव्हाण हे एक संवेदनशील लेखक होते.'

      यावेळी डॉ. चंद्रवर्धन नाईक, डॉ. अनिल गवळी, डॉ. राजेश घोरपडे समन्वयक डॉ. जे. जे. व्हटकर, सह- समन्वयक प्रा. जी. पी. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. निबंधवाचन सत्रासाठी अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. मीना मोहिते  (बेळगाव) उपस्थित होत्या. कर्नाटक व महाराष्ट्रातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी केले. तर आभार प्रा. जी. पी. कांबळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विविध ठिकाणाहून आलेले प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment