पारगड ते मिरवेल रस्ता प्रश्नी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2023

पारगड ते मिरवेल रस्ता प्रश्नी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

किल्ले पारगड परिसरातील रस्त्याचे संग्रहित छायाचित्र.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    गेली अनेक वर्षे रखडलेला पारगड किल्ल्यापासून मिरवेल हा दीड किलोमीटर रस्ता सुधारणा काम मंजूर असूनही जिल्हा नियोजन मंडळाच्या उदासीनतेमुळे निधी अभावी रखडले आहे. हे काम तात्काळ सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मिरवेल ग्रामस्थांनी दिला आहे.

    किल्ले पारगडसह पंचक्रोशीतील गावे गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहेत. चंदगड तालुक्यातील सिंधुदुर्ग हद्दीवरील मिरवेल हे शेवटचे गाव आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी पारगड किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत रस्ता झाला आहे. तथापि तिथून पुढे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरवेल ग्रामस्थांना बारमाही रस्ता उपलब्ध नाही. याबाबत ग्रामस्थांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दीपक केसरकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली होती. त्यांच्या सूचनेनुसार राज्य मार्ग १८७ पासून मिरवेल गावापर्यंतचा रस्ता ग्रामीण मार्ग क्र. ४५ ची सुधारणा करण्यासाठी अंदाजपत्रकीय रक्कम रु. ४८ लाख ९६ हजार ११५ इतकी मंजूर करण्यात आली आहे. तथापि या कामास अद्याप जिल्हा नियोजन समितीकडून अनुदान उपलब्ध झालेले नाही. याबाबत जिप. बांधकाम विभागाकडून जिल्हा नियोजन समितीस निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाच महिन्यापूर्वीच कळवले असले तरी नियोजन मंडळाकडून अद्याप काहीच हालचाली दिसत नाहीत. या प्रश्नी ना. केसरकर यांनीच लक्ष घालून निधी उपलब्ध करून द्यावा व कामाची सुरुवात करावी अशा आशयाचे निवेदन पुन्हा एकदा ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना दिले आहे.

        जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. पावसाळ्यात आजारी रुग्ण तसेच जंगल परिसरामुळे सर्पदंशाच्या घटना घडल्यास वाहतुकीची सोय नसल्यामुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे हा रस्ता तात्काळ होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment