ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा - कलाकार आत्माराम पाटील, चंदगड महाविद्यालयात ग्राहक दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2023

ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा - कलाकार आत्माराम पाटील, चंदगड महाविद्यालयात ग्राहक दिन साजरा


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

आजच्या घडीला कोणत्याही व्यवसाय संस्थेची सुरुवात ग्राहका पासून होते. ग्राहकाच्या प्रतिसादावरच व्यवसाय संस्थांचे यश-अपयश अवलंबून असते. म्हणून ग्राहक हाच बाजारपेठेचा राजा असून, "ग्राहक देवो भव" या तत्त्वाचा सर्व संस्थांनी स्वीकार केला पाहिजे. परंतु विभिन्न प्रकारचे प्रचंड ग्राहक संख्या असलेल्या भारता मध्ये आजही वस्तू व सेवांच्या विक्रेत्या कडून ग्राहकांची पिळवणूक होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे *जागो ग्राहक जागो* या घोषवाक्यानुसार समाजाचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन गडिंग्लज येथील शिवार लघुपटाचे प्रसिद्ध कलाकार आत्माराम पाटील यांनी मांडले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित *जागतिक ग्राहक दिन* सप्ताह कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक करून 15 मार्च या जागतिक ग्राहक दिनाचा उद्देश विशद केला. श्री आत्माराम पाटील पुढे म्हणाले, आपण सर्वजण ग्राहक आहोत.  मात्र आपण खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवातून समाधानी आहोत का? जर ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होत नसल्यास, आपण ग्राहक हक्काबाबत संवेदनशील नसल्याचे स्पष्ट होते.  म्हणून आपल्या ग्राहक हक्काचे संरक्षण करण्याचा प्रयत्न आपण प्राधान्याने केला पाहिजे. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ पाटील म्हणाले, ग्राहकांचे समाधान हाच आधुनिक व्यवसाय संस्थांचा उद्देश असतो. त्यामुळे ग्राहकांना सेवा सुविधा द्वारे पर्याप्त समाधान देण्याचा त्यांनी निरंतर प्रयत्न करायला हवा. तर ग्राहकांनी सजगतेने/जागृकतेने आपले प्राप्त हक्क अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी भारतात सन 1986 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अमलात आला आहे. या कार्यक्रमात प्रा. एस. के. सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. पी सी देशपांडे, प्रा. ए. डी. कांबळे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राधिका अष्टेकर यांनी केले. तर आभार डॉ. टी. ए. कांबळे यांनी मानले.



No comments:

Post a Comment