राजगोळी खुर्द येथे पोषण आहार पंधरवडा साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2023

राजगोळी खुर्द येथे पोषण आहार पंधरवडा साजरा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

         एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय चंदगड, कोवाड बीट अंतर्गत राजगोळी खुर्द येथील अंगणवाडी क्र १०७,१०८,१९६,२४५ मध्ये 'पोषण आहार पंधरवडा साजरा करण्यात आला. पोषण आहार पंधरवडा' कार्यक्रम सुरू करण्यात आला. उपक्रमाच्या जनजागृतीसाठी राजगोळी येथील सर्व  अंगणवाडी मधील सेविका, मदतनीस यांच्या वतीने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. 

       यावेळी बेटी बचाओ- बेटी पढाओ, लक्ष्मी आली घरा- तिचे स्वागत करा, सही पोषण- देश रोशन अशा घोषणा देत प्रबोधन करण्यात आले. अन्नप्राशन दिवस अंतर्गत ० ते ६ महिन्याच्या बाळाला अंगणवाडी येथे बोलावून त्याचा अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आला. मुलींच्या जन्माचे स्वागत या विषयांतर्गत मुलीच्या आईचे व बाळाचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच सुनंदा कडोलकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका प्रेमा सडाके यांनी उपस्थितांचे स्वागत करून आहार पंधरवाड्याची माहीती दिली. 

         यावेळी उपस्थित माता पालकांसह सर्वानी  भारतीय बैठकीनुसार पंगत बसवून पसायदानाने भोजनाचा आस्वाद घेतला.यावेळी आरोग्य सेविका प्रतिभा पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस आशा सेविका माता पालक उपस्थित होत्या. आभार लक्ष्मी पाटील यांनी मानले. यावेळी प्रकल्प अधिकारी वनिता इष्टे यांनी हा कार्यक्रम ४ एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून या काळात तालुक्यात विभाग वार रोज विविध उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment