निट्टूर (ता. चंदगड) येथे तब्बल 30 वर्षांनी रंगला माजी विद्यार्थी सहकुटुंब स्नेहमेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2023

निट्टूर (ता. चंदगड) येथे तब्बल 30 वर्षांनी रंगला माजी विद्यार्थी सहकुटुंब स्नेहमेळावा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       निट्टूर (ता. चंदगड) येथील २६ मार्च २०२३ रोजी श्री नरसिंह हायस्कूल येथे १९९३ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सहकुटुंब माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशास्तवन व स्वागतगीत हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी सादर केले.

        अध्यक्षस्थानी शिस्तप्रिय शिक्षक एम. वाय. पाटील होते. अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना ते म्हणाले ``नव महाराष्ट्र या शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना विविध शाळांमध्ये मी काम केले. पण ज्या वेळेला मी निटूरला आलो आणि खरोखरच येथील शाळेमधील विद्यार्थी पाहिले तर एकापेक्षा एक हुशार, नम्र, प्रचंड इच्छा शक्ती असणारे विद्यार्थी पहिले अन आम्ही भारावून गेलो. आजच्या घडीला पाहिले तर ते विविध क्षेत्रांमध्ये चौफेर अशी कामगिरी करताना दिसत आहे.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी प्रा. डॉ. राजू साळुंखे यांनी केले. मेळाव्यानिमित्त एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत रमून गेले. प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. जमलेल्या सर्व विद्यार्थ्यापैकी गोपाल दळवी, सचिन पाटील, हनुमंत पाटील, अमर साळुंखे, विजय पाटील, गणपत पाटील इत्यादी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून सध्याच्या कामाचे स्वरूप, कामाचे कार्यक्षेत्र, शाळेविषयी व शिक्षका विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भावना व्यक्त करताना सुख दुःख, आनंद, समाधान कृतज्ञता, उपकार अशा काही भावनांनी वातावरण भारावून गेले. 

       एका छताखाली एकाच शाळेतील विविध क्षेत्रातील काम करणारे विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद, समाधान ओसंडून वाहत होता. याप्रसंगी उपस्थित दळवी, नार्वेकर, व्ही. बी. पाटील, एम. के. पाटील, ए. जी. पाटील, एम. वाय. पाटील नाईक या शिक्षकांचा शाल, फेटा, श्रीफळ, बुके व पेन देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख उपस्थितीत सरपंच गुलाब पाटील, उपसरपंच सचिन पाटील, युवराज पाटील सध्याचे मुख्याध्यापक खनगुतकर होते. माजी विद्यार्थ्याकडून शाळेच्या सर्व विद्यार्थना वही व पेन भेट देण्यात आली. सूत्रसंचालन आनंद पाटील व अमर साळुंखे यांनी केले आभार कृष्णा पाटील यांनी मांडले. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुस्थितीत नियोजन केले.

No comments:

Post a Comment