पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सोमवारी बक्षीस वितरण, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

19 March 2023

पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सोमवारी बक्षीस वितरण, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांची उपस्थितीचंदगड : सी. एल. वृत्तसेवा
   मराठी पत्रकार परिषद मुंबई, संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित "पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३" ही स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने गेला महिनाभर अमाप उत्साहात पार पडली. अंतिम  सामन्यावेळी स्पर्धेत सहभागी एकूण २४  संघांपैकी केवळ मोजके संघ हजर असल्याने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता.
   त्यानुसार सोमवार दि. २० मार्च  २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम तहसील कार्यालय चंदगडच्या सभागृहात संपन्न होणार आहे. दिवाणी न्यायालय चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे भूषण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर (तात्या) यांच्यासह स्पर्धा सल्लागार  सहन्यायाधीश चारुदत्त शिपकुले, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, तालुका आरोग्य अधिकारी बी. डी. सोमजाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यांच्या हस्ते स्पर्धेचा विजेता महावितरण इलेव्हनला भव्य ट्रॉफीसह 'दक्ष कलेक्शन फिरता चषक' तर खेडूत स्पोर्ट्स संघास उपविजेतेपदाचा चषक प्रदान करण्यात येणार आहे. सुपर एट फेरीत पोचलेले संघ चंदगड पोलीस, प्राथमिक शिक्षक, वनविभाग चंदगड, तहसील कार्यालय, एलआयसी इंडिया त्याचबरोबर स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केलेले आरोग्य विभाग, वकील असोसिएशन, पत्रकार इलेव्हन, न्यायालय, एसटी महामंडळ, पोलीस पाटील, कृषी विभाग, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षक ब, नगरपंचायत चंदगड, पाटणे वनविभाग, बँक ऑफ इंडिया, डॉक्टर असोसिएशन, महा-ई-सेवा केंद्र, आजी-माजी सैनिक संघटना, पतसंस्था फेडरेशन, बँक ऑफ बडोदा या सर्व २४ संघांना  आकर्षक स्मृती गौरव चिन्ह तर प्रत्येक टीम मधील १५ खेळाडूंना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. 
  तरी सर्व संघ तथा कार्यालय प्रमुख, कर्णधार, खेळाडू व समर्थक यांनी वेळेत उपस्थित राहावे. यावेळी सर्वांनी आपल्या टी-शर्ट मध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आवाहन चंदगड तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment