चंदगड पत्रकार संघाने क्रिकेटच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्र आणले..!- महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर, पत्रकार ऑफिसर्स सोशल वर्कर्स क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

21 March 2023

चंदगड पत्रकार संघाने क्रिकेटच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकत्र आणले..!- महाराष्ट्र केसरी पै. विष्णू जोशीलकर, पत्रकार ऑफिसर्स सोशल वर्कर्स क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

   "चंदगड तालुका पत्रकार संघाने 'पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३' च्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना एकत्र आणले. यातून त्यांना शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती राखण्यास नक्कीच मदत होईल." असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांनी केले. ते चंदगड तालुका पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चंदगड दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अमृत बिराजदार अध्यक्षस्थानी होते.

   तहसीलदार कार्यालय चंदगड येथील सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे यांनी केले. चंदगड तालुका पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकीतून केलेली अनेक कामे महाराष्ट्रातील पत्रकारांना दिशादर्शक ठरतील अशी आहेत. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अधिकारी,  कर्मचारी खेळाडूंच्या जीवनात उत्साह आणि आनंद निर्माण  केला. सुट्टीच्या दिवशी महिनाभर सुरू असलेली ही स्पर्धा संपूच नये असे आपल्याला वाटत होते. असे गौरवोद्गार न्यायाधीश बिराजदार यांनी काढले. 

यावेळी सहन्यायाधीश चारुदत्त शिपकुले, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत, वैद्यकीय अधिकारी अरविंद पठाणे, बँक ऑफ इंडिया चंदगड शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर यांनी समायोजित भाषणातून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पैलवान विष्णू जोशीलकर यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्याच्या घटनेला ३७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या २० फेब्रुवारी या जयंतीनिमित्त आयोजित या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग घेतला होता.  स्पर्धेचे विजेतेपद 'महावितरण' संघाने तर उपविजेते पद 'खेडूत स्पोर्ट्स' संघाने पटकावले. चंदगड वन विभाग व प्राथमिक शिक्षक हे आणखी दोन संघ उपांत्य फेरीत दाखल झाले होते. पत्रकार संघाच्या वतीने या सर्व २४ संघांना गौरव चिन्ह तर सहभागी ४०० खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक सुनील काणेकर, दक्ष कलेक्शनचे परशराम गायकवाड, शंकर मनवाडकर आदींसह सर्व संघांचे कर्णधार, खेळाडू व समर्थकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल धुपदाळे, संपत पाटील, चेतन शेरेगार, संतोष सावंत- भोसले, संतोष सुतार, राहुल पाटील, महेश बसापुरे, प्रकाश ऐनापुरे, तातोबा गावडा आदी सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. राजेंद्र शिवणगेकर यांनी आभार मानले.No comments:

Post a Comment