दिनबंधू ग्रुपमुळे चंदगड तालुक्यातील शाळा झाल्या समृद्ध - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2023

दिनबंधू ग्रुपमुळे चंदगड तालुक्यातील शाळा झाल्या समृद्ध

निट्टुर (ता. चंदगड येथे कोवाड केंद्रातील शाळांना साहित्य वाटप करताना दीनबंधू ग्रुपचे सदस्य सोबत केंद्रातील मुख्याध्यापक व विद्यार्थी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     दिनबंधू ग्रुप कोल्हापूर व मुंबई यांच्याकडून चंदगड तालुक्यातील ३० शाळांना हजारो रुपयांचे शैक्षणिक व क्रीडा साहित्य मोफत पुरवठा करण्यात आले. त्यांच्या विद्यार्थी उपयोगी साहित्यामुळे चंदगड तालुक्यातील शाळा समृद्ध झाल्या आहेत. 
     ग्रुप मार्फत नुकतेच कोवाड बीट मधील शाळांना गणेश विद्यामंदिर निटूर येथे साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनबंधू ग्रुपचे प्रमुख कीर्तीभाई मेहता हे होते. स्वागत मुख्याध्यापिका कविता पाटील यांनी केले. केंद्रप्रमुख सुधीर मुतकेकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन शंकर कोरे यांनी केले. यावेळी सेवाभावी ग्रुपचे सदस्य नंदकुमार जाधव यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेताना आपल्या ग्रुपमध्ये कोल्हापूर, मुंबई, कराड सह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक उद्योजक सहभागी असून सेवाभावी वृत्तीतून त्यांनी केलेल्या योगदानामुळे आम्ही महाराष्ट्रभर शासकीय शाळांना शैक्षणिक व क्रीडा साहित्य देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खारीचे योगदान देत आहोत, असे सांगितले. आभार मानताना केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील म्हणाले सध्या अनेक प्रकारच्या मंडळांचे पेव फुटले आहे. पण आपल्या देशातील गोरगरीब मुलांचे शिक्षण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी झटणाऱ्या दीनबंधू ग्रुप सारखी मंडळे दुर्मिळ असल्याचे सांगितले.
यानंतर तालुक्यात विभाग वार दिनबंधू ग्रुप मार्फत दुर्गम व डोंगराळ तसेच गरजू शाळांना पुस्तके, चार्ट, लेखन साहित्य, तक्ते, विविध खेळांचे साहित्य देणगी स्वरूपात मोफत वितरण आले. यात चंदगड तालुक्यातील बुक्कीहाळ बुद्रुक, कडलगे खुर्द, गणेश विद्यामंदिर निट्टूर, चेन्नेटी, चिंचणे, घुल्लेवाडी, शिवणगे, यर्तेनहट्टी, भोगोली, तळगुळी, जेलुगडे, गौळवाडी, मलगेवाडी, फाटकवाडी, वाळकुळी, बेरडवाडा, पाटणे, इनाम सावर्डे, कुर्तनवाडी, तावरेवाडी, आंबेवाडी, मलतवाडी, दौलत हलकर्णी, मळवी, ढेकोळी खुर्द, ढेकोळी बुद्रुक, यशवंतनगर, शेवाळे, भेळेभाट आदी शाळांना हे साहित्य दिल्यामुळे शाळा समृद्ध होण्यास मदत झाली आहे. या कामी चंदगड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ सुमन सुभेदार यांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment