'चंदगडी' कलाकारांची नाटके डावलल्यामुळे स्थानिक कलाकारांची 'चंदगडी नाट्य महोत्सवाबाबत' तीव्र नाराजी - चंदगड लाईव्ह न्युज

24 April 2023

'चंदगडी' कलाकारांची नाटके डावलल्यामुळे स्थानिक कलाकारांची 'चंदगडी नाट्य महोत्सवाबाबत' तीव्र नाराजी


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील स्थानिक कलाकार व त्यांच्या नाट्य संस्थांना डावलून बाहेरच्या व्यावसायिक नाट्य संस्थांची नाटके आणून गल्लाभरू काम 'चंदगडी नाट्य महोत्सव' नावाखाली गेली चार-पाच वर्षे सुरू आहे. नाट्य रंगभूमीशी संलग्न चंदगड तालुक्यातील स्थानिक हौशी कलाकार तसेच चंदगडी कलाकारांनी स्थापन केलेल्या 'नाट्यसंस्कार' संस्थेच्या वतीने या प्रवृत्तीचा प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर निषेध केला आहे.

   गेली चार-पाच वर्षे हा कथित 'चंदगडी नाट्य महोत्सव' सुरू असून तो आठ दिवस चालतो यात रोज एक नाटक सादर केले जाते. यंदा हा महोत्सव २२ ते २८ एप्रिल अखेर कार्वे येथे होणार आहे. सुरुवातीस या महोत्सवाच्या माध्यमातून चंदगड तालुक्यात तालुक्यातील नाट्य क्षेत्राशी निगडित लेखक, निर्माता, दिग्दर्शक, अभिनय, संगीत व नृत्य दिग्दर्शक, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, वितरक, एडिटर आदी कलाकारांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळाले असे वाटले होते. पण पहिल्या वर्षीपासूनच सर्वांचा सगळ्यांचा भ्रमनिरास झाल्याचे स्पष्ट झाल्याने मूळच्या चंदगडी कलाकारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चंदगड तालुक्यातील कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे आदी ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त असलेल्या कलाकारांनी पदरमोड करून 'नाट्यसंस्कार' नावाची संस्था स्थापन केली आहे. या माध्यमातून चंदगड तालुक्यातील कलाकारांना संधी देण्याचे काम गेल्या दहा वर्षात सुरू आहे. या संस्थेची निर्मिती असलेल्या 'स्वामी'कार रणजीत देसाई यांच्या बारी कादंबरीवर आधारित 'सबूद' नाटकाला नाट्य प्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. संस्थेच्या अन्य नाट्यकृतीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. यातून चंदगड तालुक्यातील कलाकारांना संधी मिळत आहे. तथापि 'चंदगडी नाट्य महोत्सव' या संस्थेकडे वारंवार विचारणा करूनही तालुक्यातील संस्था व कलाकारांना मुद्दाम डावलले जात असल्याचा आरोप होत असून महोत्सवाच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'पैसा चंदगड तालुक्यातील जनतेचा संधी मात्र परक्यांना' असे चित्र दिसत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचा 'नाट्यसंस्कार' चे दिग्दर्शक जीवन कुंभार (किणी), लेखक, दिग्दर्शक, अभिनेते व कवी शिवाजी विष्णू पाटील (नागरदळे), अभिनेता दिग्दर्शक दयानंद सरवणकर (मलतवाडी), अभिनेता, संपादक अमोल पाटील (बसर्गे), निर्माता संजय कृष्णा पाटील (नागरदळे) आदींनी पत्रकार द्वारे निषेध केला असून याचा जाब तालुक्यातील नाट्यशौकिन व जनतेने संबंधितांना विचारावा असे आवाहन केले आहे.



No comments:

Post a Comment