उत्साही ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. माधुरी सावंत भोसले प्रशस्तीपत्र स्वीकारताना.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील उत्साळी ग्रामपंचायत सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव या मानांकनात पहिली आली. शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. आता महाराष्ट्र सरकार ही मुंबई येथे सत्कार करणार आहे.
ग्रामपंचायत च्या यशाबद्दल चंदगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे. दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 17 ते 21 एप्रिल राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह साजरा करण्यात आला. या अंतर्गत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ झाला. कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री भगतसिंग कुलस्ते, केंद्रीय प्रंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, सचिव सुनील कुमार यांच्या उपस्थितीत काही प्रमुख पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले. संयुक्त राष्ट्राने ठरवलेल्या विविध नऊ श्रेणीतील सतत विकासाच्या मानांकनानुसार सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव या सातव्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी चंदगड तालुक्यात उत्साळी ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. संयुक्त सचिव केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज संतोष कुमार यांच्या हस्ते सरपंच माधुरी संतोष सावंत भोसले व ग्रामसेवक युवराज मगदूम यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत ने सामाजिक दृष्ट्या सुरक्षिततेमध्ये महिला सक्षमीकरण व बाल विकास मध्ये काम केले महिलांवर ग्रामपंचायतीने विशेष भर दिला. ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीमध्ये लसीकरण आरोग्य तपासणी महिलांना एकत्र करणे अवघड होते. अशावेळी आशा स्वयंसेवी का अंगणवाडी सेविकाच्या मदतीने महिलांना लसीकरण करून योग्य उपचार केले. किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाबरोबरच पोषण आहार वाटप केला. गावातील वंचित घटकांच्या मनातील न्यूनगंड दूर करून सन्मानाने जगण्यासाठी बळ दिले. विधवा ही एक अनिष्ट प्रथा आहे. नष्ट होण्यासाठी विधवा सन्मानाने जगण्यासाठी त्यांच्या हस्ते झेंडा पूजन करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. गावामध्ये दहावी बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते झेंडावंदन हा नवीन उपक्रम राबविला. आशा सेविका व अंगणवाडी सेविका या नेहमीच गरोदर व स्तनदा माता व महिलांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये यशोदाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, चंदगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, विस्तार अधिकारी ठोंबरे, कांबळे तसेच सर्व पंचायत समिती अधिकारी वर्ग माझ्यासोबत सातत्याने असणाऱ्या माझ्या ग्रामपंचायतीचे प्रामाणिक सदस्य व गावातील हितचिंतक ग्रामस्थांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याचे सरपंच सौ. माधुरी संतोष सावंत भोसले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment