कोवाड येथे शनिवारी बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2023

कोवाड येथे शनिवारी बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुद्ध

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा 

        बलभीम व्यायाम मंडळ, तालीम संघ व ग्रामस्थ कोवाड (ता. चंदगड)  यांच्यावतीने शनिवार दि २२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता रणजीत नगर- कोवाड ता. चंदगड येथील भव्य आखाड्यात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. 

       मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता नरळे (तालीम गंगावेश) विरुद्ध ऑल इंडिया चॅम्पियन पै विक्रम शेटे (इचलकरंजी) यांच्यात होणार आहे. दोन नंबरची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन पै कृष्णा कांबळे (तालीम मोतीबाग) विरुद्ध कर्नाटक चॅम्पियन पै शिवय्या पुजारी (मठपती आखाडा बेळगाव), तृतीय क्रमांक ची कुस्ती पै सतपाल नागटिळक (तालीम गंगावेश) विरुद्ध कीर्तीकुमार बेनके (कार्वे), चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै रुपेश धर्मोजी (कोवाड) विरुद्ध दर्शन जाधव (कंग्राळी) यांच्यात होणार आहे. याशिवाय पै ओमकार पाटील (मोतीबाग) विरुद्ध पै रोहित पाटील (कंग्राळी), पै विक्रम पाटील (शिनोळी) विरुद्ध पै ऋतुराज मासाळ (ता. गंगावेश),  दर्शन चव्हाण (कोल्हापूर) विरुद्ध पृथ्वीराज पाटील (कंग्राळी), अजय कवडे (गंगावेश) विरुद्ध  पै प्रेम कंग्राळी, पै इंद्रजीत मोळे (गंगावेश) विरुद्ध आदित्य पाटील (कवठेपिरान), निरंजन पाटील (येळ्ळूर) विरुद्ध रोहित चव्हाण (कवठेपिरान) अशा ३९ काटाजोड, थरारक कुस्त्या होणार आहेत. याशिवाय पार्थ पाटील ( कंग्राळी) विरुद्ध ओमकार पाटील (राशिवडे) व रोहन पाटील (कडोली- बेळगाव) विरुद्ध राजवर्धन पाटील (कवठेपिरान) या दोन कुस्त्या आखाड्याचे आकर्षण ठरणार आहेत. 

          तर भीमा कुरबुर व मल्लाप्पा कुरबुर (मलतवाडी) यांनी लावलेल्या जंगी मेंढ्यांसाठी जोड पाहून कुस्त्या होणार आहेत. आखाड्याचे पूजन जि प सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते होणार असून यावेळी आमदार राजेश पाटील, उद्योगपती रमेश रेडेकर, महाराष्ट्र केसरी पै विष्णू जोशीलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हलगी सम्राट हनुमंत घुले यांची रणहलगी व  कृष्णा चौगुले राशिवडे यांचे धावते समालोचन मैदानाची रंगत वाढविल. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या तुल्यबळ, थरारक कुस्त्यांचा लाभ कुस्ती शौकिनांनी घ्यावा. असे आवाहन आयोजकांतर्फे अध्यक्ष तानाजी आडाव, सचिव एम. एन. पाटील, जिवणू धर्मोजी, देवजी पाटील, शंकर पाटील आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment