जोडीदाराची निवड करताना विवेकाची गरज - रेश्मा खाडे, चंदगड महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2023

जोडीदाराची निवड करताना विवेकाची गरज - रेश्मा खाडे, चंदगड महाविद्यालयात जोडीदाराची विवेकी निवड कार्यक्रम

मार्गदर्शन करताना रेश्मा खाडे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           'प्रेम आणि आकर्षण यात मूलभूत फरक आहे.  तथापि आयुष्याचा जोडीदार निवडताना पूर्ण विचार करावा लागतो. आपला समाज स्त्री कडून केवळ सौंदर्याची  अपेक्षा करतो तर पुरुषांनी मात्र सधन श्रीमंत असावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. विवाह करताना जोडीदार अनुरूप आहे का नाही याची खात्री केली पाहिजे. तथापि जोडीदाराची अनुरूपता केवळ बाह्य सौंदर्यावर ठरवू नये. बौद्धिक, भावनिक आणि मूल्यात्मक अनुरुपता विचारात घेऊन विवाह  केला तर निश्चितच संसार सुखाचा व शाश्वत होईल.' असे प्रतिपादन  रेश्मा खाडे (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर) यांनी  केले. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित  केलेल्या "जोडीदाराची विवेकी निवड" या कार्यक्रमात बोलत होत्या. 

         यावेळी बोलताना अमृता जाधव यांनी जन्माचा जोडीदार निवडताना पूर्ण विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले. हुंडा, पत्रिका, कुंडली याचा फारसा विचार न करता स्वभाव जुळतात का हे पाहिलेपाहिजे. जोडीदाराच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या पाहिजेत. लग्न करताना प्रेम विवाह किंवा अरेंज्ड मॅरेज यापेक्षा परिचयोत्तर विवाह घडले पाहिजेत. विवाहखर्चाला आळा घातला पाहिजे." असे प्रतिपादन केले.

          अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पाटील यांनी सुशिक्षित युवकांनी  बुवाबाजी, गंडे दोरे, मंत्र तंत्र, ताईत, अंधश्रद्धा यांच्या विळख्यातून संपूर्ण  समाजाला मुक्त करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक  महाविद्यालयाच्या विवेक वाहिनीचे समन्वयक डॉ. एम. एस. दिवटे यांनी केले. सूत्रसंचालन ए. डी. कांबळे यांनी केले तर डॉ. एम. एम. माने यांनी आभार मानले. यावेळी भास्कर सुतार, डॉ. एन. एस. मासाळ, एस. एन. पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे,  एस. व्ही. कुलकर्णी, डॉ. एस. एस. सावंत, टी. एम. पाटील, व्ही. के. गावडे,  मयुरी कांडर, सुवर्णा कोळी, डॉ. आर. ए. कमलाकर यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तसेच संयोजकांनी ओव्हर हेड प्रोजेक्टद्वारे  सविस्तर माहितीचे सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment