पाणी उपसा परवाना देण्यासाठी लाच स्वीकारताना चंदगड पाटबंधारे खात्याचा कर्मचारी जाळ्यात, कोल्हापूर लाचलुचपत विभागाची कारवाई - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2023

पाणी उपसा परवाना देण्यासाठी लाच स्वीकारताना चंदगड पाटबंधारे खात्याचा कर्मचारी जाळ्यात, कोल्हापूर लाचलुचपत विभागाची कारवाई


चंदगड / प्रतिनिधी

    ताम्रपर्णी नदीतुन शेतीसाठी पाणी उपसा परवाना देण्यासाठी पाच हजाराची  लाच स्वीकारताना चंदगड लघु पाटबंधारे खात्यातील कर्मचारी सागर गुणवंत गोळे ( वय ३६ मोजणीदार, वर्ग 3, चंदगड लघुपाटबंधारे शाखा क्र. १, चंदगड, ता. चंदगड) याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (१७ रोजी) चंदगड येथे करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईची माहिती दिली. 

    चंदगड तालुक्यातील एका तक्रारदार शेतकर्‍याने ताम्रपर्णी नदीतून शेतीसाठी रीतसर पाणी उपसा परवाना मिळणेसाठी चंदगड लघुपाटबंधारे विभागाकडे अर्ज केला होता. त्याप्रमाणे पाणी उपसा करणेसाठी परवानगी देणेसाठी चंदगड लघुपाटबंधारे विभागातील कर्मचारी सागर गोळे याने आठ हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यापैकी तक्रारदार शेतकर्‍याने तीन हजार रुपयाची लाच कर्मचारी गोळे याला दिली. त्यानंतर पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड लघुपाटबंधारे विभागाचा कर्मचारी गोळे याला रंगेहात पकडले. 

        लाचलुचपतचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, पो.ना सुधीर पाटील, पो.ना सचिन पाटील, पो.कॉ मयूर देसाई, चालक पो.हे.कॉ विष्णू गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.


No comments:

Post a Comment