तारेवाडी नजीक मोटरसायकल अपघात, चंदगड तालुक्यातील बालकाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

25 April 2023

तारेवाडी नजीक मोटरसायकल अपघात, चंदगड तालुक्यातील बालकाचा मृत्यू


चंदगड : सी एल वृत्तसेवा
 हडलगे- नेसरी दरम्यान तारेवाडी गावाच्या हद्दीत मोटरसायकलच्या अपघातात मोटरसायकल वरील आई वडील जखमी झाले असून ६ वर्षाचा बालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृत व जखमी चंदगड तालुक्यातील किटवाड गावचे रहिवासी आहेत. ही घटना मंगळवार दि. २५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ४.३५ च्या सुमारास घडली
  याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, किटवाड ता. चंदगड येथील रामचंद्र महादेव हेब्बाळकर हा पत्नी स्वप्नाली रामचंद्र हेब्बाळकर हिच्यासह मुलगा मानस रामचंद्र हेब्बाळकर वय ६ वर्षे याला घेऊन मोटरसायकल वरून नेसरी, (ता. गडहिंग्लज) येथे आधार कार्ड बनवण्यासाठी गेला होता. परत येताना तारेवाडी गावच्या हद्दीत सरकारी बागेजवळच्या धोकादायक वळणावर मोटरसायकल स्लिप होऊन खाली पडली यात पती-पत्नी जखमी झाले तर मुलगा मानस याचा मृत्यू झाला. अपघातनंतर तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच मानस याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद नेसरी पोलीस ठाण्यात झाली असून भरधाव वेगाने, अविचाराने व हयगयीने गाडी चालवून स्वतः व पत्नी जखमी होण्यास तसेच मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप रामचंद्र याच्यावर ठेवण्यात आला आहे. याची फिर्याद सागर शिवाजी सिताप एसटी चालक चंदगड आगार यांनी पोलिसात दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव व तडवी हे करत आहेत. घटनेची माहिती समजताच किटवाड गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड सारख्या ठिकाणी कायमस्वरूपी आधार कार्ड काढण्याची सुविधा नसल्यामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment