ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू, कामांवर होणार विपरीत परिणाम - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2023

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू, कामांवर होणार विपरीत परिणाम

राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचे निवेदन पं.स. चंदगड येथे देताना ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

          महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (आयटक संलग्न) यांच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन दि. १० एप्रिल २०२३ पासून करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन दिल्यानंतर यापूर्वी शासनाला दिलेल्या निवेदन व आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली असून या राज्यव्यापी  आंदोलनात चंदगड तालुक्यातील सर्व कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती संघटना अध्यक्ष परशराम जाधव यांनी दिली. 

निवेदन देण्यापूर्वी काही काळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती चंदगड कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
          निवेदनात राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचे शंभर टक्के अनुदान द्यावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी मिळावी, सर्व कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांना सुधारित राहणीमान भत्ता मिळावा, मागील देणे रक्कम व किमान वेतनातील फरक रक्कम तात्काळ मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देताना तालुकाध्यक्ष परशराम जाधव, सचिव एकनाथ राघोजी, संजय दळवी, तानाजी वाईंगडे, शिवाजी कांबळे, नरसू कांबळे,  यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंस. कार्यालयाच्या वतीने  विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत)  यांनी निवेदन स्वीकारले.

         या आंदोलनामुळे गावोगावी पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा उठाव आदी कामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

                                     

No comments:

Post a Comment