कालकुंद्री- कागणी मार्गावर सांडपाण्याची तळी, वाहन चालकांची कसरत - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2023

कालकुंद्री- कागणी मार्गावर सांडपाण्याची तळी, वाहन चालकांची कसरत

कालकुंद्री गावाजवळ ओढ्यावरील मोरीच्या दूतर्फा साठलेले सांडपाणी, यातून वाट काढताना वाहनधारक.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

        कालकुंद्री ते कागणी हा दोन किलोमीटर रस्ता गेली अनेक वर्षे दुरावस्थेमुळे चर्चेत आहे. अनेक वर्षे मागणी करूनही अद्याप रस्ता झालेला नाही. त्यात आता कालकुंद्री गावाशेजारील ओढ्यावरील मोरीच्या दुतर्फा सांडपाण्यामुळे साठलेल्या तळ्यांची भर पडली आहे. यातून मार्ग काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. या सांडपाण्याचे तात्काळ व्यवस्थापन करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा अशी मागणी वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.

      चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून तो गडहिंग्लज- बेळगाव राज्य मार्गाला हत्तरगी येथे पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. गेल्या काही वर्षात राजगोळी खुर्द ते हत्तरगी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण झाले आहे. तथापि कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द अशी मोठी गावे असलेल्या दहा किलोमीटर अती वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण रखडले आहे.

       या मार्गावरील प्रत्येक गावात रस्त्यालगत झालेली अतिक्रमणे वाहनधारक व प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत असताना त्यात आता कालकुंद्रीजवळ रस्त्यातील तळ्यांची भर पडली आहे. कालकुंद्री ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन पाण्याचा योग्य निचरा होईल यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.No comments:

Post a Comment