चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नेहमी जिद्द ,मेहनत ,ध्येय ठरवा. पारितोषिक वितरण करणे म्हणजे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे होय. कौशल्य कसे टिकवता व वाढवता येईल याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम महाविद्यालय करत असते. कोणतेही क्षेत्र असू दे स्वतःला सिद्ध करा. परीक्षार्थी व जीवनार्थी शिक्षणात फरक असतो. ज्ञानार्जनासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी पायी प्रवास करून महाविद्यालयात येतात हे खूप कौतुकास्पद आहे.' असे प्रतिपादन दौलत विश्वस्त संस्थेचे मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) दौलत विश्वस्त संस्थेच्या गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित 'वार्षिक पारितोषिक वितरण' समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नागठाणे (सांगली) येथील प्रसिद्ध कथाकथनकार हिम्मत पाटील उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, व्यवस्थापक मनोहर होसुरकर, वामन खांडेकर, बसवंत अडकुरकर, संचालक उत्तम पाटील, प्राचार्य डॉ. बी .डी . अजळकर, सरपंच माधुरी कागणकर,( तावरेवाडी) डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रा. एन एम कुचेकर, डॉ. अर्जुन पिटूक, तेजस पाटील, माधुरी सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.चंद्रकांत पोतदार यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय नॅक समन्वयक डॉ.राजेश घोरपडे यांनी करून दिला. प्राचार्य डॉ. बी. डी . अजळकर यांनी अहवाल वाचनातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
विविध क्षेत्रात भरघोस यश प्राप्त केलेले महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वर्ग व आदिंचा सन्मान मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. दरवर्षी महाविद्यालय यशस्वी लोकांना शाबासकीची थाप देण्यासाठी पारितोषिक वितरण करत असते म्हणून यावर्षीही अनेकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. पीएचडी, नेट सेट व आदी क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल पंचवीस जणांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
रवी सुतार, महादेव लोंढे, डॉ. शाहू गावडे, डॉ. शीला देशमुख, डॉ . विठोबा पाटील, डॉ. श्रीकांत सदावर, डॉ. अर्जुन पिटूक, डॉ. दौलत कांबळे, डॉ. सुरज सुतार, डॉ.मोहन घोळसे, आप्पाजी ससेमारी, किशोर पाटील, पूजा हिक्के, ऋतुजा पेडणेकर, दयानंद चिंचणगी, बसवंत अडकुरकर, ज्ञानेश्वर पाटील, माधुरी कागणकर, डॉ. असीफ बागवान, सुप्रिया गवसेकर, सलोनी वाईंगडे, प्राचार्य डॉ. बी . डी . अजळकर, डॉ. चंद्रकांत पोतदार, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. अशोक दोरुगडे, आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
तर महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी म्हणून कु. रणजीत होनगेकर (बीएससी भाग तीन) याची तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु. माधुरी सुतार( बीकॉम भाग तीन) हिची निवड करण्यात आली तसेच बीकॉम भाग तीन या वर्गाची आदर्श वर्ग म्हणून निवड करण्यात आली. विविध वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हास्तरीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरती विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांच्या यशस्वी खेळाडूंचा ही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जिमखाना विभाग प्रमुख डॉ.अर्जुन पिटूक यांनी यशस्वी खेळाडूंची नावे जाहीर केली.
प्रमुख पाहुणे हिम्मत पाटील हे बोलताना आपल्या मनोगतात म्हणाले, 'ग्रामीण भागात कथेची गंभीर तसेच विनोदी जडणघडण होत असते. शेती आणि मातीशी नाळ जोडणार आपल महाविद्यालय आहे. चंदगड भूमी ही अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. इथे त्यांच्या विचारांचा वारसा जपला जातो. कथेला मोठा इतिहास आहे तर कथाकथनाला मोठी परंपरा आहे.'
संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव आपल्या मनोगतात म्हणाले, 'आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी कुठेही कमी पडत नाही तो सर्व गुण संपन्न आहे. आपले विद्यार्थी हे विविध क्षेत्रात चमकत आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातात जेणेकरून ते भविष्यात उंच भरारी घेऊ शकतील. आयुष्याचे खरे शिक्षण महाविद्यालयात मिळत असते.'
याप्रसंगी विविध पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, आजी-माजी विद्यार्थी, प्रशासकीय वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जी. जे . गावडे आणि प्रा . पी . ए. बोभाटे यांनी केले तर सर्वांचे आभार प्रा . एन . एम. कुचेकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment