लाकूडवाडी घाटात अपघातातील जखमी शिक्षकाचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2023

लाकूडवाडी घाटात अपघातातील जखमी शिक्षकाचे निधन

 

विजय यल्लाप्पा पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

लाकूडवाडी ता. गडहिंग्लज येथील घाटात छोटाहत्ती चारचाकी वाहन अंगावर पडून झालेल्या अपघातातील जखमी प्राथमिक शिक्षकाचे आज (दि. १२/०५/२०२३ रोजी उपचारादरम्यान निधन झाले. विजय यल्लाप्पा पाटील (वय ५५ रा. कालकुंद्री, ता. चंदगड) (अध्यापक विद्यामंदिर मोळवडे, ता. शाहूवाडी) असे निधन झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

   विजय पाटील हे दिनांक २१ एप्रिल रोजी शाळा करून आपल्या दुचाकी वरून गडहिंग्लज मार्गे कालकुंद्रीकडे येताना लाकूरवाडी घाटात छोटाहत्ती वाहना मागून येत होते. इतक्यात समोरील वाहन न्यूट्रल होऊन मागे सरकले व पाठोपाठ येणाऱ्या विजय पाटील यांच्या अंगावर कलंडले. डोक्यावरचे हेल्मेट फुटून त्यांच्या छातीला मार लागला, तर दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले. या अवस्थेत त्यांना गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मूळ गावी कालकुंद्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

  देवांच्या नावावर कागदपत्रे, इन्शुरन्स नसताना फिरणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी विजय पाटील यांच्या अंगावर पडलेले चारचाकी वाहन (छोटा हत्ती, हौदा टेम्पो) हे साईबाबा, विठ्ठल- रखुमाई आदी देवतांचे फोटो, मुर्ती गाडीत ठेवून त्यांच्या नावावर गावोगावी देणग्या मागत फिरणाऱ्या फिरस्त्यांचे होते असे समजते. चौकशीत या वाहनाचा कुठल्याही प्रकारचा विमा नसल्यामुळे अपघातातील मृताचे नातेवाईक मिळणाऱ्या विमा रकमेपासून वंचित राहिल्याचे समजते. देवांच्या नावावर अशी विना कागदपत्रे व इन्शुरन्स फिरणाऱ्या वाहनांवर पोलीस व आरटीओ विभागाने कडक कारवाई करावी. अशी मागणी मृताचे नातेवाईक, ग्रामस्थ व नागरिकांतून होत आहे.




No comments:

Post a Comment