कायद्याच्या चौकटीत राहून सैनिकांना शासन सर्वोतोपरी मदत करणार - तहसिलदार राजेश चव्हाण - चंदगड लाईव्ह न्युज

11 May 2023

कायद्याच्या चौकटीत राहून सैनिकांना शासन सर्वोतोपरी मदत करणार - तहसिलदार राजेश चव्हाण


चंदगड तालुका आजी-माजी सैनिक वेलफेअर असोसिएशनच्या मेळाव्याला उपस्थित असलेले सैनिक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       सैनिक देशासाठी सर्वस्व अर्पण करतात. पण सर्व सामान्य समाजात जीवन जगताना याच सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चंदगड तालूक्यातील सर्व आजी - माजी सैनिकांना येथील शासन कायद्याच्या चौकटीत राहून सहकार्य करण्याचे आश्वासन चंदगडचे तहसिलदार राजेश चव्हाण यांनी दिले.

मेळाव्याप्रसंगी बोलताना तहसीलदार राजेश चव्हाण

 कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले हायस्कूलच्या क्रिडांगणावर चंदगड तालूक्यातील आजी माजी सैनिक वेलफेअर असोसिएशन चा सैनिक मेळावा पार पडला. या मेळाव्यात तहसिलदार राजेश चव्हाण प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रामराव देसाई होते. चंदगडचे पोलीस निरिक्षक संतोष घोळवे यांची प्रमुख उपस्थिती होते.

  प्रारंभी शिवप्रतिमा, गणेश प्रतिमा व शाहिद जवान राजेंद्र तुपारे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. उपस्थित मान्यवरांच्या स्वागतानंतर १९६२, १९६५ व १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या जवानांचा व विर पत्नींचा सन्मान करण्यात आला. सैनिक फेडरेशनच्या जिल्हाध्यक्ष सौ. रुपाली जुगळे, प महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, कुमार पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी नामदेव पाटील, इसिएच अधिकारी बी. टी. पाटील, कॅ. रविंद्र मंडलिक आदिनी सैनिकांच्या अडचणी, शासनाच्या विविध योजना यांच्या सदर्भात मनोगते व्यक्त केली. पो. निरिक्षक संतोष घोळवे यांनी आजी-माजी सैनिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या मेळाव्याला चंदगड तालूक्यातील सर्व आजी माजी सैनिक संघटना एकत्र आल्या होत्या. चंदगडच्या एन सी सी कॅडेटनी समारंभस्थळी मोठे सहकार्य केले. प्रास्ताविक कपिल गवस यांनी केले. आभार सुभेदार परशराम पाटील यांनी मानले.



No comments:

Post a Comment