काही लोक आम्ही केलेल्या विकासकामांची कामांची उद्घाटने करत आहेत - आमदार राजेश पाटील
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
२०१४ पासून देशात भुलभुलय्या, दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. खात्यावर पंधरा लाख जमा होणार! दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार! अशी आश्वासने हवेत विरली. पण हे जास्त दिवस चालत नाही हे कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालातून आज सिद्ध झाले. असे प्रतिपादन चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी केले. ते जक्कनहट्टी (ता. चंदगड) येथे कृतज्ञता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
स्वागत राजाराम इराप्पा पाटील यांनी केले. प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील म्हणाले, "चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित चंदगड लाईव्ह न्युज (सी. एल. न्यूज) चे पत्रकार चेतन शेरेगार व अन्य पत्रकारांनी जक्कनहट्टी ग्रामस्थांच्या रस्त्या संदर्भातील व्यथांना व्हिडिओ बातमीद्वारे वाचा फोडल्यामुळेच खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले. तत्कालीन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या प्रयत्नातून या कामाला गती मिळाल्याचे आवर्जून सांगितले." यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, "चंदगड मतदार संघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची उद्घाटने काही लोक आपणच ही कामे केल्याच्या अविर्भावात करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जक्कनहट्टी ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोवाड ते जक्कनहट्टी रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण केला. यासाठी निट्टुरच्या शेतकऱ्यांनी विना मोबदला आपल्या जमिनी देऊन मोठे सहकार्य केले आहे. हा रस्ता पुढे मलतवाडी- सांबरे रस्त्याला लवकरच जोडण्यासाठी आपला प्रयत्न राहील. माझे वडील नरसिंगराव पाटील यांनी आपली हयात तालुक्याच्या विकासासाठी घालवली. ५० वर्षे आम्ही चंदगडच्या विकासासाठी झगडतोय. पण गत निवडणुकीत पंधरा दिवसांपूर्वी आलेला उमेदवार प्रथम क्रमांकाची मते तालुक्यातून घेतो हे दुर्दैव म्हणावे लागेल.
यावेळी रस्त्याच्या पूर्ततेसाठी जमीन देऊन योगदान दिलेले शेतकरी, पत्रकार, अधिकारी यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीन रण्यात आला. कार्यक्रमापूर्वी ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केलेल्या जक्कुबाई मंदिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निट्टूरचे सरपंच गुलाब पाटील, घुल्लेवाडीचे सरपंच युवराज पाटील, पोलीस पाटील यल्लाप्पा पाटील, नामदेव पाटील, मुख्याध्यापक श्रीकांत पाटील, तलाठी राजश्री पचंडी, ग्रामसेवक नीलकंठ सांबरेकर, जे. एन. वर्पे आदींसह जकनहट्टी, घुल्लेवाडी, निट्टूर ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन पाटील यांनी केले. आभार एकनाथ नरसु पाटील यांनी मानले.
No comments:
Post a Comment