मार्गदर्शन करताना सुहास गुरव, शेजारी संयोजक डॉ. कांबळे
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
'भारतीय शेअर बाजारात फायदेशीर गुंतवणुकीची आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता असून विद्यार्थ्यांनी या आव्हानात्मक क्षेत्राकडे करिअरची संधी म्हणून पहावे.' असे प्रतिपादन गुंतवणूक सल्लागार सुहास गुरव यांनी केले. ते माडखोलकर महाविद्यालयातील कॉमर्स विभागाच्या वतीने आयोजित भारतीय शेअर बाजारातील आधुनिक प्रवाह या विषयावर मार्गदर्शन करत होते.
ते पुढे म्हणाले की,' केंद्र सरकारच्या जागतिकीकरणाच्या व उदारीकरणाच्या धोरणामुळे भारतीय शेअर बाजाराचे स्वरूप आणि कार्यपद्धती यात प्रचंड बदल झाला आहे. पूर्वी मर्यादित लोकांमध्ये आणि शहरी भागात असणाऱ्या या क्षेत्राकडे ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. सोपी आणि सुटसुटीत ऑनलाईन व्यवहार पद्धतीमुळे प्रतिभूती खरेदी विक्रीचे व्यवहार सुरक्षितपणे व तत्काळ पूर्ण होत आहेत. आतापर्यंत या क्षेत्रापासून दूर असलेल्या लोकांमध्ये स्टॉक क्सचेंज, तेथील व्यवहार, गुंतवणूक, बाजारातील तेजी मंदी आणि त्यातून होणारा नफा तोटा याविषयीच्या जाणिवा निर्माण होत आहेत. मर्यादित गुंतवणूक, शेअर बाजाराच्या कार्यपद्धतींचा आणि त्यातील संकल्पनांचा शास्त्रशुद्ध अभ्यास,तसेच धोका पत्करण्याची तयारी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे करिअर घडविण्याची व त्यातून हमखास उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आतापासूनच या क्षेत्राचा अभ्यास करून त्यात तयारीने उतरावे असा सल्ला श्री गुरव यांनी दिला. आपल्या व्याख्यानात त्यांनी वित्तीय व्यवस्थापन, गुंतवणुकीचे मार्ग, शेअर बाजारातील गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी या विषयावर ही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ. टी. ए . कोबळे यांनी केले.
No comments:
Post a Comment