जिल्ह्यातील 'पोलीस पाटलांचे' स्वखर्चाने प्रबोधन करणारा कोण आहे हा अवलिया... - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2023

जिल्ह्यातील 'पोलीस पाटलांचे' स्वखर्चाने प्रबोधन करणारा कोण आहे हा अवलिया...

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व विद्यमान पोलीस पाटीलांना राजर्षी शाहूंचे शैक्षणिक, सामाजिक, जातीभेद निर्मूलनाचे कार्य समजून देण्याबरोबरच गाव पातळीवरील आपल्या पदासंबंधी परिपूर्ण ज्ञान, माहिती प्रबोधनाच्या माध्यमातून देण्याचे कार्य गेली काही वर्षे चन्नेकुपी (ता. गडहिंग्लज) चे पोलीस पाटील तानाजी रामचंद्र कुरळे अखंडपणे करत आहेत. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील प्रबोधनाचा टप्पा नुकताच पूर्ण केला.

    तानाजी कुरळे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांना सक्षम करण्याची धडपड वाखाणण्यासारखी आहे. त्यांच्या या धडपडीची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घेतली आहे. या उपक्रमाचे महत्त्व ओळखून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आपल्या क्षेत्रातील पोलीस पाटीलांना एकत्र करून त्यांना कुरळे यांच्या प्रबोधनाचा लाभ मिळवून देण्याचे आदेश दिले होते. कुरळे यांनी कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता स्वखर्चाने इतक्या दूरवर जाऊन आपला या पदाविषयीचा अभ्यास, कार्य, अनुभव, इतरांना देण्याची तळमळ पाहून उपक्रमाचे स्वागत व अभिनंदन केले आहे.

         या मार्गदर्शनात देशातील पोलीस पाटील पदाच्या निर्मितीचा इतिहास व प्रवास, छत्रपती शिवरायांच्या काळात व त्यानंतर राजर्षी शाहूंच्या काळातील या पदाचे अधोरेखित झालेले महत्त्व, दरारा, पाटीलकी वतने, विविध  आदेश, व्यक्तिमत्त्व कसे असावे आधी मुद्द्यांचा समावेश आहे. त्यांनी केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात पोलीस पाटलांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले आहे.  कुरळे यांना या विधायक उपकमासाठी किसनराव कुराडे, प्राचार्य सातापा कांबळे, गणपतराव पाटोळे, अरविंद बारदेस्कर, प्रकाश चव्हाण, प्रा. सुरेश वडराळे, बाळासाहेब मुल्ला, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसिलदार ऋषिकेश शेळके आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment