महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा...! चंदगड तालुक्यातील जनतेचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

09 May 2023

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा...! चंदगड तालुक्यातील जनतेचे आवाहन

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       गेल्या काही वर्षात कर्नाटक व्याप्त सीमा भागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. त्यांना कोणी वाली राहिलेला दिसत नाही. मराठी भाषिकांतील दुहीचा फायदा घेऊन येथे गेल्या काही वर्षात राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार निवडून येत आहेत. त्यांना येथील मराठी भाषिक बांधवांच्या समस्यांशी काही देणे घेणे नसते. त्यामुळे उद्या होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 'महाराष्ट्र एकीकरण समितीच्या' उमेदवारांना मतदान करून आपले हक्काचे प्रतिनिधी कर्नाटक विधानसभेत पाठवण्याची गरज आहे. हे ओळखून सीमा भागालगत असलेल्या चंदगड तालुक्यातून बेळगाव, खानापूर, निपाणी आदी परिसरात जाऊन राहिलेल्या मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणावे असे आवाहन चंदगड तालुक्यातील जनतेच्या वतीने करण्यात आले आहे. 

       बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी गेली ६६ वर्षे आंदोलने सुरू आहेत. आंदोलनातून अनेक युवकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलून प्राणांची आहुती दिली आहे. या शहीद आंदोलकांच्या त्यागाची आठवण ठेवून मराठी अस्मिता दाखवून देणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन होत आहे. सीमा भागाशी चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, शिरोळ, हातकणंगले अशा कोल्हापूर जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांची सांस्कृतिक देवाण-घेवाण, रोटी बेटी व्यवहार मोठ्या प्रमाणात आहेत. बऱ्याच वेळा किरकोळ कारणांसाठी ही सीमा भागात जाणे येणे साठी लोकांची अडवणूक केली जाते. या सर्वांचा विचार करून मराठी अस्मिता कर्नाटक विधानसभेत टिकवून ठेवण्यासाठी हक्काचे मराठी भाषिक उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी सीमा भागातील मतदारांनी तसेच महाराष्ट्रातून सीमा भागात जाऊन राहिलेल्या मतदारांनी केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करून विजयी करावे. अन्यथा आपल्या पुढील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. असे आवाहन चंदगड तालुक्यातील स्वाभिमानी जनतेकडून होत आहे.



No comments:

Post a Comment