पारगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, हजारो शिवभक्तांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

06 June 2023

पारगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, हजारो शिवभक्तांची उपस्थिती

कार्वे / सी. एल. वृत्तसेवा
      मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद जवान वेल्फेअर फौंउंडेशन, शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ पारगड यांच्या संयुक्त विद्यमाने पारगड येथे 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ले रायगडच्या धरतीवर होणाऱ्या या राज्याभिषेक सोहळ्यास बेळगाव सीमा भागासह कोकणातून, गडहिंग्लज  व चंदगड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांनी प्रचंड संख्येने उपस्थिती लावली होती. 

       5 जून 2023 रोजी दुपारी मजरे कार्वे येथून पालखीतून शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुप्रसिद्ध हलगी वादक राजू आवळे  व त्यांच्या साथीदारांच्या हलगी वादनाने या मिरवणुकीत रंगत भरली होती. सायंकाळी सर्वच शिवभक्त पारगड येथे दाखल झाले. गडाची स्वच्छता, गड पूजन हे कार्यक्रम पार पाडून रात्री सुप्रसिद्ध संगीतकार अभिजीत पाटणे व त्यांच्या साथीदारांचा बहारदार गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित शिवभक्तानी भरभरून दाद दिली. रात्री उशिरा राजू आवळे यांच्या हलगी वादनाने गोंधळाचा जागर करण्यात आला. हलगीच्या ठेक्यावर अवघी तरुणाई थिरकली.

        6 जून 2023 रोजी पहाटे मजरे कार्वे येथील भजनी मंडळाचा काकडा आरती कार्यक्रम झाला. सकाळी ध्वजारोहण, शस्त्रास्त्र पूजन व भंडारा उधळण करण्यात आले. यावेळी वातावरण शिवमय झाले होते. शिवभक्तांमध्ये चैतन्य पसरले होते. आम. राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वळीवडे येथील आखाड्याच्या टीमने अंगावर शहारे आणणारी शस्त्रास्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली. त्याच टीमने लेझीम द्वारे पालखीची मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भवानी देवी मंदिरासमोर आणली व राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक पराग निट्टूरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बुद्धभूषण या ग्रंथातील काही ओव्या संदर्भासहित व अर्थासहित सादर केल्या व राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पालघर ग्रामस्थ चंदगड, आजरा, गडहिंग्लज,  सीमा भागातून व तळ कोकणातून प्रचंड संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
                व्यसनमुक्तीचा संदेश
            राज्याभिषेक सोहळ्यानंतर ह भ प डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने व्यसनमुक्तीचा संदेश सोडला. त्या संदेशाला सन्मान देऊन उपस्थित पाच शिवभक्तानी  शिवाजी महाराजांच्या व भवानी मातेच्या साक्षीने व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला आहे.
     रस्ता व पाण्याची परिस्थिती जैसे थे
   पारगड येथे गेली पाच वर्षे राज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे. दरवर्षी येथे पाण्याची फार मोठी अडचण निर्माण होत असते. त्याचबरोबर गडावर जाणारा रस्ता वन खात्याच्या आडमुटी धोरणामुळे अर्धवट रखडला आहे. गडावर वाहने जाणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे गडाच्या पायथ्याशी वाहने लावून शिवभक्त गडावर पोहोचले. मात्र या शिवभक्तातून नाराजी जाणवत होती. पिण्याच्या पाण्याचे संकट तर पारगड वाशीयांच्या पाचवीलाच पुजले आहे. त्यावर कारवे येथील मंडळाने मात करत कारवे इथूनच ट्रॅक्टर ट्रॉलीतुन पाण्याच्या टाक्या भरून गडावर नेल्या व या संकटावर मात केली.

शासकीय पातळीवर उदासीनता कायम
     गेली पाच वर्ष चंदगड, आजरा, गडहिंग्लज व सीमा भागातून शिवभक्त या गडावर येतात व हा राज्याभिषेक सोहळा साजरा करतात. मात्र याची दखल शासकीय पातळीवर कुठेही घेतलेली दिसत नाही. वन विभागाचे काही कर्मचारी अपवाद सोडले तर एकही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत नाही. त्यामुळे शिवभक्तातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.


No comments:

Post a Comment