तिलारी धरणात दोन सख्खे भाऊ बुडाले, शोध मोहीम सुरू - चंदगड लाईव्ह न्युज

11 June 2023

तिलारी धरणात दोन सख्खे भाऊ बुडाले, शोध मोहीम सुरू

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       कुटुंबासोबत फिरायला आलेले दोन सख्खे भाऊ हाजगोळी (ता. चंदगड) येथील महादेव मंदिरा नजिक तिलारी धरणाच्या जलाशयात बुडाले. रेहान अल्ताफ खान  (वय १५) व मुस्तफा अल्ताफ खान (वय १२, राहणार कॅम्प बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना काल शनिवारी दि. १० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. पाऊस आणि अंधारामुळे शोध मोहिमेत सहभागी स्वयंसेवकांना त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. आज रविवार पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

       याबाबत चंदगड पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, ``बेळगाव येथील अल्ताफ खान पत्नी व मुलांना घेऊन सहलीचा आनंद लुटण्यासाठी या परिसरात आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यावर सर्वांनाच पाण्यात भिजण्याचा मोह झाला. काठावर पाण्यात खेळताना अंदाज न आल्याने मुस्तफा व रेहान दोघेही पाण्यात बुडाले. आई-वडिलांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. शेवटी त्यांनी आरडा ओरड केली पण निर्जन परिसरात आसपास कोणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही परिणामी दोन्ही सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती समजतात चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पानबुड्यांना पाचारण करून त्यांच्या साह्याने शोध घेण्यात आला. मात्र पाऊस आणि अंधारामुळे मोहीम थांबवण्यात आली. आज रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली. घटनास्थळी खान कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

       गेल्या काही वर्षात किटवाड, तिलारी, आंबोली परिसरात येणाऱ्या विशेषतः बेळगावच्या डझनभर पर्यटकांनी आपले जीव गमावले आहेत. अशा घटना पुन्हा पुन्हा होऊ नयेत. यासाठी पर्यटकांनी सावधगिरी बाळगूनच सहलीचा आनंद लुटावा असे आवाहन पोलीस स्टेशन चंदगड व संबंधित ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment