अबब...! घरात घुसला जहाल विषारी ८ फुटी नाग - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2023

अबब...! घरात घुसला जहाल विषारी ८ फुटी नाग

मारुती साळुंखे निट्टूर यांच्या घरातून संदीप टक्केकर यांनी पकडलेला नाग

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    निट्टूर (ता. चंदगड) येथील मारुती साळुंखे यांच्या शेतातील राहत्या घरात ८ फूट लांबीचा जहाल विषारी नाग घुसल्यामुळे कुटुंबीयांची भीतीने गाळण उडाली. मारुती साळुंखे यांचा मुलगा प्रमोद याला काल दि. ९ रोजी दुपारी हा साप घरात घुसताना दिसला. त्यांनी तात्काळ ढोलगरवाडी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सर्प शाळेचे संचालक तानाजी वाघमारे यांना घटनेची माहिती मोबाईल वरून दिली. मुंबई येथे असलेल्या वाघमारे यांनी तात्काळ आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांचे चिरंजीव सर्पमित्र संदीप टक्केकर यांना याबद्दल सांगताच क्षणाचाही विलंब न लावता ढोलगरवाडी पासून २० किमी वरील निट्टूर येथील मारुती साळुंखे यांचे घर गाठले. यावेळी घरातील सर्व सदस्य भयभीत अवस्थेत साप गेलेल्या ठिकाणी लक्ष ठेवून होते. संदीप यांनी साप गेलेल्या ठिकाणाची अडगळ बाजूला करून सापाला शिताफिने पकडण्यात यश मिळवले. या जहाल विषारी नागाची लांबी तब्बल ८ फूट होती. पकडलेल्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी संदीप सापाला ढोलगरवाडी येथे घेऊन गेले. आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवताना संदीप टक्केकर दाखवलेली तत्परता व सामाजिक बांधिलकी याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

*सर्पशाळेच्या मान्यतेवर टांगती तलवार*

आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांनी १९६६ साली ढोलगरवाडी येथील मामासाहेब लाड विद्यालयाशी संलग्न सुरू केलेल्या सर्प शाळेतून आजतागायत हजारो सर्पमित्र तयार झाले आहेत. ते जगाच्या कानाकोपऱ्यात साप या पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापाला जीवदान देण्याचे तसेच लोकप्रबोधनाचे कार्य करत आहेत. महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यातील पोलीस, वन विभाग, आर्मी, वैद्यकीय महाविद्यालय तील विद्यार्थी, डॉक्टर, शिक्षक यांच्यासाठी संशोधन केंद्र बनले आहे. असे असताना ही सर्पशाळा नियम व अटींची पूर्तता करत नसल्याच्या कारणास्तव झू ऑथॉरिटी व वन विभागाने याची मान्यता रद्द करून येथे असलेले विविध जातींचे सर्प ठेवण्यास बंदी घातली आहे. सर्प शाळेला तात्पुरती मदत वाढ मिळाली असली तरी मान्यता रद्द होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासना कडून पुरेशी जमीन व सोयी सुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व शासनाची उदासीनता दूर होईल का? हा प्रश्न पर्यावरण प्रेमींना पडला आहे.



No comments:

Post a Comment