चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
मोटनवाडी ते पारगड, मिरवेल राजमार्ग क्र. १३१ या रस्त्यावर कललेली धोकादायक झाडे व फांद्या काढण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी उपवनसंरक्षक कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लवकरच मान्सून चा पाऊस सुरू होत आहे. चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील इसापूर, पारगड, नमखोल, मिरवेल, वाघोत्रे, तेरवण परिसर तालुक्यातील सर्वाधिक पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील जोरदार पर्जन्यवृष्टी व वादळी वारे यामुळे पावसाळ्यात नेहमी दुर्घटना घडत असतात. यात बऱ्याच वेळा रस्त्यावर झाडे पडून वाहतूक खंडित होणे, वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांवर झाडे पडून वीज पुरवठा खंडित होणे, असे प्रकार वारंवार घडत असतात. सध्य परिस्थितीत मोटनवाडी पासून मिरवेल पर्यंतच्या २५ किलोमीटर परिसरात बरीच झाडे रस्त्यावर तसेच विद्युत तारांवर कललेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यात अशी झाडे केव्हाही रस्त्यावर किंवा विजेच्या तारांवर पडून वीज पुरवठा व वाहतूक खंडित होण्याची शक्यता आहे. अशावेळी पंचक्रोशीतील नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हा संपूर्ण भाग जंगल परिसर असल्यामुळे नागरिकांना जंगली प्राण्यांपासून इजा, सर्पदंश अशा घटना नित्याच्या आहेत.
अशा प्रसंगी वाहतूक बंद असेल तर रुग्णांना प्राणास मुकावे लागते. आजच्या डिजिटल युगात वीज पुरवठा खंडित झाल्यानेही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हे टाळण्यासाठी वन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी यांच्या समन्वयाने मोठी वाहने तसेच एसटीला लागणाऱ्या वाकलेल्या झाडांच्या फांद्या तसेच तारांवर पडण्याच्या स्थितीत असलेली धोकादायक झाडे तोडून संभाव्य दुर्घटना व गैरसोय टाळावी. अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रघुवीर खंडोजी शेलार यांनी उपवनसंरक्षक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग कोल्हापूर, आगार व्यवस्थापक चंदगड यांना दिली आहे.
No comments:
Post a Comment