सी एल न्यूजच्या वृत्ताचा परिणाम - कोवाड- माणगाव मार्गावर पॅचवर्क काम सुरू... ! - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2023

सी एल न्यूजच्या वृत्ताचा परिणाम - कोवाड- माणगाव मार्गावर पॅचवर्क काम सुरू... !

खड्डेमय कोवाड ते माणगाव रस्त्यातील खड्ड्यांचे सुरू असलेले डांबरी पॅचवर्क

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील अत्यंत महत्त्वाचा कोवाड ते माणगाव रस्ता खड्डेमय झाला होता. या रस्त्याचे डांबरी पॅचवर्क काम मंजूर असूनही ठेकेदाराकडून टाळाटाळ होत होती. याबाबतचे वृत्त चंदगड तालुक्याचे मुखपत्र सी एल न्यूज ने प्रसिद्ध केले होते. परिणामी संबंधितांकडून पॅचवर्क काम सुरू करण्यात आले आहे. याबद्दल प्रवासी व वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. या प्रश्नी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षा कडूनही आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

       कोवाड, माणगाव ते पाटणे फाटा हा चंदगड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गोवा, सावंतवाडी, आंबोली परिसराला दड्डी, हत्तरगी, गोकाक पर्यंत जोडणाऱ्या पर्यायाने महाराष्ट्र गोवा व कर्नाटक या तीन राज्यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. यातील अनेक बोजड वाहनांमुळे रस्त्यात वारंवार खड्डे पडणे, काळ्या जमिनीमुळे रस्ता खचणे असे प्रकार सुरूच असतात. कोवाड- पाटणे फाटा रस्त्याचे पॅचवर्क असून मंजूर असूनही याकामी टाळाटाळ होत असल्याचे समजताच शिवसेना तालुकाप्रमुख लक्ष्मण मनवाडकर यांनी उपतालुकाप्रमुख विनोद पाटील, रवींद्र  पाटील, शाखाप्रमुख मारुती कांबळे, संदीप पाटील, गजानन पाटील, पी व्ही मुरकुटे आदी पदाधिकाऱ्यांसह जाऊन बांधकाम विभाग  अधिकाऱ्यांना निवेदन देऊन खडसावले तर ठेकेदाराला जाब विचारला होता. याबाबतची बातमी दै. पुढारीतून प्रसिद्ध होताच कालपासून पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली. त्याबाबत प्रवासी व वाहन धारकांतून समाधान व्यक्त होत आहे.

        याशिवाय चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कोवाड ते कामेवाडी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. तर कागणी ते राजगोळी खुर्द रस्त्याचे ठेकेदाराने केलेले डांबरी पॅचवर्क दोन दिवसात उखडून गेले आहे. अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment