पारगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदगड तालुका सज्ज, सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

03 June 2023

पारगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी चंदगड तालुका सज्ज, सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

 


चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       मजरे कार्वे येथील शहीद जवान वेल्फेअर फाउंडेशन व ग्रामस्थ मंडळ मजरे कार्वे आणि पारगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही सोमवार दिनांक ५ जून व मंगळवार दिनांक ६ जून रोजी राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

      किल्ले रायगड येथील होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या धरतीवर हा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. किल्ले रायगड गडावर ज्या शिवभक्तांना जाणे शक्य नाही, ते सर्व या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर पारगडावर आवर्जून उपस्थित राहतात. आणि सोहळा दिमाखात दरवर्षी साजरा होतो. सोमवार दिनांक ५ जून रोजी दुपारी गड स्वच्छता, गड पूजन, मशाल फेरी, गोंधळ, संगीत भजन व गड जागरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तर मंगळवार दिनांक ६ जून रोजी काकड आरतीने सुरुवात होणार आहे. त्यानंतर ध्वजारोहण, भंडारा उधळण, शस्त्रांचे पूजन होणार आहे. शिवकालीन युद्ध कलांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिके यावेळी सादर केली जाणार आहेत. शिवप्रतिमेच्या पूजनानंतर प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.  महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या सोहळ्यास कोकणसह सीमा भागातून व गडहिंग्लज तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शिवभक्ताने उपस्थित राहावे असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. 

कडाडणारी हलगी कार्यक्रमाचे आकर्षण

 महाराष्ट्रातील प्रसिद्ध हलगी वादक संजीव आवळे यांची हलगी हे या कार्यक्रमाचे आकर्षण राहणार आहे. संजीव आवळे यांच्या हलगींच्या निनादाची उत्सुकता चंदगड तालुक्यातील व परिसरातील शिवभक्तांना लागून राहिली आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध सुगम व शास्त्रीय संगीतकार अभिजीत पाटणे यांचे संगीत भजन हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. त्यांचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी शिवभक्तांची गर्दी  होणार आहे.



No comments:

Post a Comment