'पारगड मॅरेथॉन' स्पर्धेची जय्यत तयारी, रविवारी होणाऱ्या स्पर्धेत दिग्गज धावपटूंचा सहभाग, क्रीडा प्रेमींसाठी मेजवानी - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2023

'पारगड मॅरेथॉन' स्पर्धेची जय्यत तयारी, रविवारी होणाऱ्या स्पर्धेत दिग्गज धावपटूंचा सहभाग, क्रीडा प्रेमींसाठी मेजवानी

ड्रोनमधून घेतलेले पारगडाचे छायाचित्र

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग पर्यटन, निसर्ग संवर्धन व लोक प्रबोधनासाठी 'पारगड हेरिटेज रन' मॅरेथॉन स्पर्धा रविवार दि. ४ जून रोजी सकाळी ७ वाजता किल्ले पारगड ता. चंदगड येथे होत आहे.

मॅरेथाॅन स्पर्धेची संग्रहित छायाचित्र

         स्टाफ इंडिया, फिट इंडिया, महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, किल्ले पारगड जनकल्याण संस्था मुंबई, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत, ऑल्टिट्यूड क्वेस्ट ॲडव्हेंचर, एल एल पी, आउट प्ले स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा होत आहे. पोलीस, वन, आरोग्य विभाग व पत्रकार संघ चंदगड यांच्या सहकार्याने ऑलिंपिक स्पर्धेच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून महाराष्ट्रातील दिग्गज स्पर्धक यात सहभागी होत आहेत. क्रीडा प्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून धावपटूंना प्रोत्साहित करावे, असे आवाहन स्पर्धेचे मुख्य प्रवर्तक व गिर्यारोहण प्रशिक्षक प्रवीण चिरमुरे यांनी केले आहे. 

मॅरेथाॅन स्पर्धेची संग्रहित छायाचित्र

          स्पर्धा 'जॉय ऑफ जंगल', ५ किमी (८ वर्षांवरील मुले-मुली). 'जंगल ड्रीम रन', १० किमी (१३वर्षांवरील) व 'जंगल हाफ मॅराथॉन', २१ किमी ( १६ वर्षांवरील) अशा तीन श्रेणीत पुरुष व महिला ( मुले/मुली) साठी स्वतंत्र आहे. ऐतिहासिक किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभवही धावपटूंसाठी रोमांचकारी असेल. पारगड हेरिटेज रन 'निसर्गाचे रक्षक मोहिम' अंतर्गत निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांचे प्रबोधन तसेच क्रीडा, शारीरिक शिक्षण व युवक कल्याण विषयक उपक्रमांबाबत जनजागृती करणे, राज्यातील क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणे या हेतूने संस्था कार्यरत आहेत.

मॅरेथाॅन स्पर्धेची संग्रहित छायाचित्र

      स्पर्धा वेळापत्रक पुढील प्रमाणे- ४ जून सकाळी ५ वाजता स्पर्धकांचे आगमन, कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती व नाष्टा, ६ वाजता उद्घाटन, ७ वाजता स्पर्धेची सुरुवात, ९ ते ११ वाजता पारितोषिक वितरण, मार्गदर्शन व परिसरात वृक्षारोपण होणार आहे. यावेळी चंदगड चे आमदार राजेश पाटील, स्टाफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी  बिपिन चिरमुरे, तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले आदींसह तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू उपस्थित राहणार आहेत. सहभागी सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र, फळ झाडाचे रोपटे व टी-शर्ट दिले जाणार असून सर्व सहा गटातील अनुक्रमे तीन विजेत्यांना पदक व रोख बक्षीसे दिली जातील.

        स्पर्धेची सुरुवात व सांगता भवानी मंदिर पारगड येथे होणार असून स्पर्धा मार्गावर पहिला चेक पॉईंट विठ्ठल रुक्मिणी मंदिर नामखोल, दुसरा चेक पॉईंट सातेरी मंदिर तेरवण, अंतिम चेक पॉईंट राम घाट येथे ठेवण्यात आला आहे. स्पर्धा मार्गावर रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, पिण्याचे पाणी, ग्लुकोज  आदी सुविधा उपलब्ध राहतील. स्पर्धक व क्रीडा प्रेमींना पारगड वर येण्यासाठी चंदगड आगारातून सकाळी साडेचार व पाच वाजता एसटी बसची व्यवस्था केली असून या बस मार्गावरील सर्व थांब्यावर थांबतील.

        कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य  असून ऑनलाइन नोंदणी व अधिक माहितीसाठी www.pargad.in या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे व किल्ले पारगड जनकल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment