नांदवडे-शेवाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने आशा सेविका श्रीमती सीमा पाटील व आशा सेविका श्रीमती धनश्री पाटील यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे ग्रामपंचायत स्तरावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार नांदवडे ग्रामपंचायतीच्या वतीने आशा सेविका श्रीमती सीमा देवा पाटील व श्रीमती धनश्री नामदेव पाटील यांना देऊन गौरवण्यात आले.
श्रीमती सीमा पाटील यांचा सत्कार नांदेड गावचे तंटामुक्त अध्यक्ष भिवाजी पवार यांच्या हस्ते झाला. श्रीमती धनश्री पाटील यांचा सत्कार तंटामुक्त सदस्य जयवंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी केलेल्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम असे पुरस्कारचे स्वरूप होते.
प्रारंभी सरपंच राजेंद्र वैजू कांबळे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी उत्तम प्रशासक समाज सुधारक आणि युग प्रवर्तक अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्कारामुळे आपली सामाजिक जबाबदारी वाढल्याची भावना दोन्ही आशा सेविकांनी व्यक्त केली. अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचे सत्कारमूर्ती यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक अश्विनी कुंभार, ग्रामपंचायत सदस्य परसराम फडके, विद्यानंद सुतार, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील तंटामुक्त उपाध्यक्ष दयानंद गावडे, बाळू सुतार, शंकर पाटील, विजय कुंदेकर, परशराम पवार, दयानंद पाटील, शेवाळे पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment