मिरवेल ग्रामस्थांचे आमरण उपोषण यशस्वी...! 'महावितरण' चार दिवसात नवीन डीपी बसवणार - चंदगड लाईव्ह न्युज

22 June 2023

मिरवेल ग्रामस्थांचे आमरण उपोषण यशस्वी...! 'महावितरण' चार दिवसात नवीन डीपी बसवणार

उपोषणास बसलेले मिरवेल ग्रामस्थ मिरवेल येथे इलेक्ट्रिक डीपी बसवण्याबाबत लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देताना महावितरणचे अधिकारी विशाल लोधी
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
 नवीन इलेक्ट्रिक डीपीच्या (रोहित्र) मागणीसाठी चंदगड येथे महावितरण कार्यालय समोर सुरू असलेले मिरवेल (ता. चंदगड) ग्रामस्थांचे आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. या प्रश्नी सहकार्याबद्दल चंदगड पत्रकार संघाचे आंदोलकांनी आभार व्यक्त केले.
  मिरवेल, पारगड भागात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कडून परिसरातील विजेच्या सोयीसाठी ३८ वर्षांपूर्वी लोखंडी खांब व डीपी उभारण्यात आल्या. यातील बहुतांशी खांब गंजून मोडकळीस आले आहेत. ते बदलण्याची गरज आहे. सध्या मिरवेल येथून किल्ले पारगड वर पाणी देण्यासाठी थ्री फेज कनेक्शन देण्यात आले आहे. मिरवेल ला कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने येथे नवीन डीपी ची मागणी सुरू होती. याबाबत ३ जून २०२२ रोजी लेखी मागणी करूनही वर्ष उलटले तरी कोणत्याच हालचाली दृष्टीपथात नसल्याने ग्रामस्थांनी उपोषणास्त्र उपसले. २० जून २०२३ पासून महावितरण चंदगड कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी उपअभियंता विशाल शिवकुमार लोधी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन नवीन रोहित्र बसवण्याचे काम चार दिवसात पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले. शुक्रवार पर्यंत एक काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर पारगड, मिरवेल, नमखोल ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्याधर बाणे, बुधाजी पवार, मनोहर पवार, तुकाराम सुतार, आत्माराम बाणे, महादेव पवार, भिवा पवार आदी उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. विद्यमान सरपंच संतोष पवार, चंदगडचे नगरसेवक बाळू हळदणकर यांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला होता.No comments:

Post a Comment