सुंडी येथील चंद्रकांत लोहार यांच्या घरात पकडलेला नाग दाखवताना सदाशिव पाटील. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
संपूर्ण गाव पहाटेच्या साखर झोपेत असताना भल्या पहाटे चार वाजता सुंडी ता. चंदगड येथील चंद्रकांत शंकर लोहार यांना कशाची तरी चाहूल लागली. पाहतात तो त्यांना भला मोठा नाग घरातील जळाऊ लाकूड साठ्यात शिरताना दिसला. खाडकन जागे होत त्यांनी घरातील इतरांना उठवले. शेजाऱ्यांना याची कल्पना दिली. याचवेळी गावातील काहीजण मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. यातील काहींनी ढोलगरवाडी येथील सर्पमित्र सदाशिव पाटील यांना फोनवरून माहिती दिली. इतक्या पहाटे क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपले सहकारी शिवाजी नारायण पाटील यांना सोबत घेत ५ किमी वरील लोहार यांचे घर गाठले. सावधगिरीने सर्व लाकडे बाजूला करून शिताफिने नागाला पकडले. भला मोठा उंदीर गिळल्यामुळे नागाची हालचाल मंदावली होती, याचा फायदा त्यांनी उठवला. सापाला बाहेर काढून त्यांनी उपस्थितांना नाग दाखवला हा आपला शत्रू नसून मित्र आहे धान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांचा तो नाश करतो. पर्यावरण साखळीतील तो महत्त्वाचा घटक आहे, त्याचे रक्षण झाले पाहिजे अशा प्रकारचे प्रबोधन केले. यावेळी उपस्थित सेवानिवृतऑनररी कॅप्टन तुकाराम कांबळे, प्रताप पाटील, बाळकृष्ण निंबाळकर आदींनी सदाशिव पाटील यांच्या समाजकार्याचे अभिनंदन केले. त्यांनी समाजसेवेच्या उदात्त हेतूने आत्तापर्यंत मानवी वस्तीत घुसलेल्या विविध जातीच्या सहा हजार पेक्षा अधिक सापांना पकडून जीवदान दिले आहे. हा एक जागतिक विक्रम असू शकेल. त्यांनी मागील एका आठवड्यात तुर्केवाडी व निट्टूर येथील घरात तर पाटणे फाटा येथील विद्यार्थी वस्तीगृहात घुसलेले असे चार नाग पकडले होते.
No comments:
Post a Comment