धार्मिक तेढ वाढवणाऱ्यांची गय नाही...! - पो. नि. संतोष घोळवे, तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्राधान्य - चंदगड लाईव्ह न्युज

10 June 2023

धार्मिक तेढ वाढवणाऱ्यांची गय नाही...! - पो. नि. संतोष घोळवे, तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्राधान्य

कोवाड येथे परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, व्यापारी बंधू व मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
    चोरी, दरोडे, अपघात, मारामारी, हिट अँड रन अशा घटनांमधील आरोपींचे धागेदोरे शोधून त्यांना शिक्षा देण्यात सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतात. चंदगड तालुक्यातील बाजारपेठेची तसेच मोठी गावे व महत्त्वाच्या मार्गावर लोकसहभागातून आपण सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, समाजात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यापुढे गय करणार नाही. असे प्रतिपादन चंदगडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले. ते सद्यःस्थितीत जिल्ह्यात वाढलेली धार्मिक तेढ, दरोडे यांच्या पार्श्वभूमीवर  कोवाड पोलीस ठाणे अंतर्गत सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष, मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व व्यापारी बंधूंच्या बैठकीत मार्गदर्शन करत होते.
   ग्रामपंचायत कोवाड येथे झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत पोलीस पाटील अमृत देसाई  (कागणी) यांनी केले. यावेळी पुढे बोलताना पोनि. घोळवे म्हणाले सीसीटीव्ही वरील खर्च अनुत्पादक असला तरी प्रत्येक गावात अशी यंत्रणा बसवणे ही काळाची गरज बनली आहे. तथापि यासाठी  शासनावर अवलंबून न राहता आपली सुरक्षा आपणच करण्यासाठी लोकसहभागातून अशी यंत्रणा बसवली पाहिजे.  सध्या तालुक्यात चंदगड वगळता केवळ हलकर्णी फाटा येथे एक सीसीटीव्ही कॅमेरा कार्यरत असून ही संख्या वाढली पाहिजे. गावागावातील दानशूर व्यक्ती व व्यापारी बंधुंनी पुढे येऊन अशा यंत्रणा बसवाव्यात, जेणेकरून पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. कोवाड येथे मुख्य सहा- सात मार्गावर सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन घोळवे यांनी केल्यानंतर  व्यापारी बंधूंनी २५ जून पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचे सांगितले. सध्या सोशल मीडिया वरून धार्मिक तेढ निर्माण करणारे मॅसेज टाकणे, आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा समाजकंटकंची गय केली जाणार नाही. त्यांना थेट जेलची हवा खावी लागेल असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक यांनी शेवटी दिला. यावेळी लवकरच कर्यात भागातील कार्यकर्त्यांची दक्षता कमिटी नेमण्याचे ठरविण्यात आले. बैठकीस कोवाड पोलीस दूरक्षेत्र ठाणे अंमलदार राज किल्लेदार, अमोल देवकुळे, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त कमिटी पदाधिकारी, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोवाड केंद्र मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment