२०२४ लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार याद्या होणार अद्यावत, २१ जुलैपासून 'घरोघरी अधिकारी' उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2023

२०२४ लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर मतदार याद्या होणार अद्यावत, २१ जुलैपासून 'घरोघरी अधिकारी' उपक्रम

घरोघरी अधिकारी कार्यक्रम प्रशिक्षणात बीएलओ, पर्यवेक्षक यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार राजेश चव्हाण, सोबत निवडणूक नायब तहसीलदार सचिन आखाडे. 

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

     मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र यांच्या वतीने सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार यादी पडताळणी करून अद्यावत करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. याच्या पूर्ततेसाठी 'घरोघरी अधिकारी' उपक्रमांतर्गत २१ जुलै ते २१ ऑगस्ट या कालावधीत केंद्रस्तरीय मतदान अधिकारी तथा बी एल ओ (बूथ लेवल ऑफिसर) यांच्या सहकार्याने हे काम केले जाणार आहे. राज्यातील मतदारांनी या संधीचा १०० टक्के लाभ घेऊन आपल्या नावाची दुरुस्ती व नोंदणीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

 प्रशिक्षणावेळी उपस्थित बीएलओ

    वरील कालावधीत बीएलओ घरोघरी भेटी देणार आहेत. मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधून मतदार यादीत आपले किंवा आपल्या कुटुंबातील सर्वांची नावे नोंद आहेत की नाही हे तपासून खात्री करावी. तसेच ज्यांचे वय १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी १८ वर्षे पूर्ण आहे अशा नव मतदारांची नोंदणी, मतदार ओळखपत्र सोबत आधार कार्ड जोडणी (लिंकिंग करणे), कुटुंबातील मृत व्यक्तींची नावे वगळणे. नाव, पत्ता किंवा इतर तपशिलामध्ये दुरुस्ती असल्यास त्या दुरुस्त्या करून घेणे. स्थलांतर झाले असल्यास आपला बदललेला पत्ता अद्यावत करणे. आदी कामे या कालावधीत करण्याची आहेत. हे राष्ट्रीय कार्य १०० टक्के यशस्वी करण्यासाठी आपले योगदान देणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या बीएलओ यांना सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे. 

        या अनुषंगाने चंदगड तालुक्यातील बी एल ओ आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण तहसील कार्यालय चंदगड येथे नुकतेच पार पडले. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सचिन आखाडे, महसूल सहाय्यक अमर साळोखे, निवडणूक विभागाचे संगणक तज्ज्ञ निहाल मुल्ला यांनी वरील पडताळणी व दुरुस्तीचे काम निवडणूक विभागाच्या ॲपवर ऑनलाईन कसे करावे याबाबतची सखोल माहिती दिली. यावेळी चंदगड तालुक्यातील सर्व पर्यवेक्षक तसेच बीएलओ यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment