किल्ले पारगडवर साकारणार सुभेदार रायबा उर्फ रायाजी मालुसरे यांचे भव्य स्मारक, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी भूमिपूजन - चंदगड लाईव्ह न्युज

22 July 2023

किल्ले पारगडवर साकारणार सुभेदार रायबा उर्फ रायाजी मालुसरे यांचे भव्य स्मारक, सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी भूमिपूजन



कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला स्वराज्यातील शेवटचा व अजिंक्य किल्ला म्हणून  पारगड परिचित आहे. सिंहगड लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे शहीद झाल्यानंतर शिवछत्रपतींनी पारगड चे पहिले किल्लेदार म्हणून महाप्रतापी सुभेदार रायबा उर्फ रायाजी मालुसरे  यांची नेमणूक केली. याच किल्ल्यावर रायाजी यांचे भव्य स्मारक लवकरच साकारणार आहे. 
      सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या पुढाकाराने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे भूमिपूजन रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता पारगडवर संपन्न होणार आहे. महाराष्ट्र, गोवा सीमेवरील पार टोकाचा किल्ला पारगड, कोणत्याही परकीय शत्रूंना पारगड जिंकता आला नाही, परिणामी स्वराज्याचा अभेद्य अजिंक्य किल्ला अशी पारगडने ओळख मिळवली. चंद्र, सूर्य असेपर्यंत गड अभेद्य राखा हा महाराजांचा आदेश  शिरसावंध्य मानून सुभेदार रायाजी मालुसरे, गडावरील मावळे व त्यांचे कार्य पुढे चालवणारे वारसदार यांचा इतिहास सुवर्णाक्षरांत नोंद आहे. सुभेदार मालुसरेंनी  कित्येक वर्षे पारगडावर राहून गोव्याचे पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी या शत्रूंपासून स्वराज्याच्या सीमांचे रक्षण केले.
    पारगडवर सुभेदार रायबा मालुसरे यांच्या निधनानंतर सुमारे साडेतीनशे वर्षांनी साकारणाऱ्या स्मारक उभारण्यासाठी मालुसरे यांच्या वंशजानी स्वमालकीची जागा देत असल्याचे लेखी पत्र प्रतिष्ठानला प्रदान केले आहे. स्मारकाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी सर्व शिवभक्त व दुर्गसेवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर, दुर्ग जागर समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment