मुगळीतील 'त्या' शिक्षकाने कोणतेही गैरवर्तन केलेले नाही, शाळा व्यवस्थापन समितीचा खुलासा - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2023

मुगळीतील 'त्या' शिक्षकाने कोणतेही गैरवर्तन केलेले नाही, शाळा व्यवस्थापन समितीचा खुलासा

 

गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन देताना मुगळी येथील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        विद्या मंदिर मुगळी (ता. चंदगड) शाळेतील अध्यापक चंद्रकांत चिगरे यांचे शालेय कामकाज चांगले नाही, ते पालकांशी उद्धट वागतात अशा प्रकारचे आरोप काही ग्रामस्थांनी करत त्यांच्या बदलीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तथापि यात काही तथ्य नसून हे आरोप राजकीय व वैयक्तिक आकसातून झाले आहेत. चिगरे हे चांगले अध्यापक असून त्यांच्याकडून कोणतेही गैरवर्तन झाले नसल्याचा निर्वाळा शाळा व्यवस्थापन समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

       चिगरे हे गेली पाच वर्षे येथे अध्यापन करत असून त्यांचे अध्यापन, विद्यार्थी व पालकांशी सहकार्याचे वर्तन असते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते कायम प्रयत्नशील असतात. तथापि वैयक्तिक रागातून त्यांच्यावर आरोप करुन बदनामी करणे चुकीचे आहे. त्यांच्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीची कोणतीही तक्रार नाही असे खुलाशात म्हटले आहे. यावर अध्यक्ष दत्तू पाटील यांच्यासह सदस्य बाळू रेडेकर, सुनील माने, सुरेश कांबळे, संजय नूलकर, नामदेव सुतार, सागर रेडेकर आदींच्या सह्या आहेत.

     तथापि  एका स्वतंत्र निवेदनाद्वारे शाळेतील अन्य एका शिक्षकाचे वर्तन उद्धट असून त्यांच्याकडून वर्गात सतत मोबाईल वापरणे, पालकांना हाताशी धरून मुख्याध्यापकांना त्रास देणे, प्रशासकीय कामात सहकार्य न करणे असे प्रकार घडत असून यातून शाळेची बदनामी होत असल्याने त्यांची मुगळी शाळेतून तात्काळ बदली करावी. अशा आशयाचे निवेदन नुकतेच गटविकास अधिकारी चंदगड यांना दिले आहे यावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व पालकांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment