ब्रेकिंग न्यूज - कानूर जवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे बेळगाव- वेंगुर्ला हायवे वाहतुकीसाठी बंद - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2023

ब्रेकिंग न्यूज - कानूर जवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे बेळगाव- वेंगुर्ला हायवे वाहतुकीसाठी बंद

चंदगड तालुक्यातील ११ मोऱ्यांवरून प्रवास न करण्याच्या पोलिस प्रशासनाकडून सूचना

कोवाड बंधाऱ्यावरून सध्या असलेली ३ फुटापेक्षा अधिक पाणी पातळी

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

     चंदगड तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक बंधारे तसेच ओढ्यावरील मोरींवरून पाणी वाहत आहे. अशा पाण्यातून चालत जाणे किंवा वाहने चालवणे जीवघेणे ठरू शकते. याबाबत सावधगिरी म्हणून चंदगड पोलीस प्रशासनाने तालुक्यातील ११ मोऱ्या धोकादायक घोषित केल्या आहेत.

        चंदगड तालुक्यातील डोंगर भागात पावसाचे प्रमाण वाढलेले असून ताम्रपर्णी व घटप्रभा नद्यांच्या जलस्तरामधे खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे नदी काठावरील अनेक गावे प्रभावित झाली आहेत. पुढील नमूद पुलावरून आपली वाहने घालून तसेच प्रवास करून आपले जीवित धोक्यात घालू नये. भोगोली, पिळणी, बिजूर, हिंडगाव- इंब्राहिमपूर, चंदगड हेरे, कोनेवाडी, हल्लारवाडी, किरमिटेवाडी- झांबरे, पाटणे फाटा- माणगाव, घुल्लेवाडी, माळी पूल येथून वाहने चालवू नयेत. कोणत्याही आपत्कालीन मदतीसाठी पोलिसांना 112 किंवा 9209269995 नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संतोष घोळवे पोलीस निरीक्षक चंदगड यांनी केले आहे.


बेळगाव- वेंगुर्ला हायवे बंद

        बेळगाव वेंगुर्ला राज्य मार्गावर आज (दि. २३ जुलै २०२३ रोजी) रात्री ८.४५ वाजता कानूर खुर्द ते कानूर बुद्रुक गावानदरम्यान नदीच्या पुराचे पाणी एक फूट पर्यंत आले आहे. ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड यांचेशी संपर्क करून बेळगांव - वेंगुर्ला मार्ग बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे असेही पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले असून प्रवासी व वाहनधारक यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आली आहे.



No comments:

Post a Comment