प्रवाशी व शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार कधी? निट्टूर -घुल्लेवाडी दरम्यानच्या मोरीवर पाणीच पाणी - चंदगड लाईव्ह न्युज

23 July 2023

प्रवाशी व शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार कधी? निट्टूर -घुल्लेवाडी दरम्यानच्या मोरीवर पाणीच पाणी

निट्टूर - घुल्लेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरील मोरीवर पाणी आल्याने रस्ता वारंवार बंद होतो

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      कोवाडला जाताना घुल्लेवाडी -निटटू र दरम्यानच्या मोरीवर दरवर्षी वारंवार पाणी येत असल्याने याचा त्रास प्रवाशी व परिसरातील शेतकर्‍यांना होत आहे. कर्यात भाग व तालुक्याचे ठिकाण चंदगड यांना जोडणा-या दोन रस्त्यापैकी निट्टूर वरून जोडणारा निट्टूर - चंदगड हा महत्वाचा रस्ता. या मोरीवर वारंवार पाणी येत असल्याने आठ दिवसापर्यंत कोवाडशी संपर्क तुटतो. या मोरीची उंची वाढवावी, ही गेल्या कित्येक वर्षाची मागणी आहे. पण याकडे प्रशासनाबरोबरच राजकीय पदाधिकाऱ्यांचीही अनास्था आहे. 

      या मोरीची परिस्थिती बघितली तर पाणी जाण्याचे एकूण चार पाईप आहेत. त्यापैकी बाजुचे दोन पाईप पूर्ण बंद असून दोन पाईप अर्धस्थितीत बंद आवस्थेत आहेत. या ओढयाला येणारे पाणी हे मलतवाडी तलाव व निट्टूर तलाव क्र.१ मधून तसेच आजूबाजूला असलेल्या तीन टेकडया येते. त्यामुळे या मोरीतुन पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात होतो. परिणामी पाणी बाजूबाजूला शेतात तुंबून पिकांचेही नुकसान होते.

    रस्ताही तास दोन तासासाठी बंद होतो. हि स्थिती दरवर्षीची आहे. या मोरीवरून तळगुळी येथील एक महिला वाहून गेली. तर चालक व दुसरी महिला वाहून जाताना बालंबाल वाचली. हे कायमचे चित्र आहे.याच रस्त्यावरून कर्यात भागाचे सर्व दिग्गज मंडळी प्रवास करत असतात. पण या मोरीचे महत्व कुणाला समजलेले नाही. फक्त हा प्रश्न पावसाळ्यात निर्माण झाला कि प्रत्येकाला वाटते ही मोरी व्हायला पाहिजे आणि परत येरे माझ्या मागल्या. कोवाड, निट्टूर, घुलेवाडी, मलतवाडी, म्हाळेवाडी या शेजारच्या गावातील लोकप्रतिनिधीनाही या प्रश्नाबाबत उदासीनता जाणवते. प्रत्येक जण स्वतःच्या गावच्या विकासात अडकलेले दिसतात. या चार गावाच्या लोकप्रतिनिधिनी कधी एकत्रित येऊन पाठपुरावा केल्याचे दिसत नाही.

         पाऊस पडला कि प्रशासकीय यंत्रणा या ओढयावर किती पाणी आले आहे याची दररोज तेही पूर्ण पावसाळभर माहिती घेत असताना दिसते. यामध्ये तहसील कार्यालय, पोलीस विभाग, बांधकाम विभाग हे सर्वच कामाला लागलेले दिसतात. मग या शासकीय यंत्रणांना या मोरीची उंची वाढवण्याची गरज दिसत नाही का?...कि उन्हाळा आला कि सर्व विसरून जाताना दिसतात.

    या मोरीची उंची कमी असल्यामुळे शेजारच्या जवळपास 15-20 एकर शेतीतील पाणीच कमी होत नाही. त्यामुळं पीक उत्पादनावर याचा परिणाम होत आहे.

No comments:

Post a Comment