आजरा, कोवाड- बेळगाव वाहतूक बंद होणार...! कोवाड- दुंडगे, कोवाड- पाटणे फाटा मार्ग बंद - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2023

आजरा, कोवाड- बेळगाव वाहतूक बंद होणार...! कोवाड- दुंडगे, कोवाड- पाटणे फाटा मार्ग बंद

 

कोवाड बाजारपेठेत दुंडगे रस्त्यावर आलेले पुराचे पाणी

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे कोवाड मधून दुंडगे, कामेवाडीकडे जाणारी वाहतूक काल दि. २३ पासून बंद झाली आहे. याशिवाय निट्टूर ते घुल्लेवाडी दरम्यानच्या ओढ्यावरील मोरीवर वारंवार पाणी येत असल्यामुळे माणगाव कडे जाणारी वाहतूक बंद आहे. माणगाव ते पाटणे फाटा दरम्यान ताम्रपर्णी नदीवरील बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे हा मार्ग गेले दोन दिवस बंद आहे. त्यामुळे बेळगावहून माणगावला येताना त्यामुळे तांबूळवाडी, रामपूर मार्गे यावे लागत आहे. सद्यःस्थितीत ढोलगरवाडी फाटा, कडलगे, किणी, कागणी, कालकुंद्री, कुदनूर, राजगोळी, दड्डी, हत्तरगी, कोल्हापूर मार्ग सुरू आहे.

घुल्लेवाडी- निट्टूर दरम्यान मोरीवरून मोठ्या पावसात असे पाणी वाहत असते.

         पश्चिम भागात सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे ताम्रपर्णी नदीची पातळी निरंतर वाढत आहे. परिणामी कोवाड नदीपलीकडील स्टॅन्ड परिसरात किणी हद्दीत कागणी रस्त्यावर गुडघाभर पाणी आले आहे. यात आणखी थोडी वाढ झाल्यास कोवाड पासून बेळगाव कडील पर्यायाने आजरा, नेसरी, गडहिंग्लज पासून बेळगाव कडे होणारे दळणवळण कोणत्याही क्षणी ठप्प होऊ शकते. 

कोवाड- कागणी मार्गावर आलेल्या पाण्यातून सुरू असलेली वाहतूक.

       दरम्यान पूल, मोरी व रस्त्यावर आलेल्या पाण्यातून कोणतेही वाहन घालू नये किंवा चालत जाण्याचा धोका पत्करू नये. असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, तहसीलदार राजेश चव्हाण व प्रशासकीय यंत्रणे कडून करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment