पूर ओसरला तरी गाड्या डेपोतच...! चंदगड आगाराचा अजब कारभार, प्रवाशांची गैरसोय - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2023

पूर ओसरला तरी गाड्या डेपोतच...! चंदगड आगाराचा अजब कारभार, प्रवाशांची गैरसोय

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी, घटप्रभा नद्यांचा पूर ओसरला आहे. तरीही चंदगड डेपोतील काही गाड्या अजून जागीच थांबून आहेत. चालक, वाहक आगार व्यवस्थापकांच्या आदेशाची तर शेकडो प्रवासी 'एसटी'ची वाट पाहत रस्त्यावर व गावोगावच्या स्टँन्ड, पिकप शेडमध्ये थांबून आहेत. याचे काहीच सोयर सुतक नसल्यासारखे व कारण नसताना गाड्या व कर्मचाऱ्यांना आगारातच नाहक थांबून ठेवण्याची चंदगड आगार प्रमुखांची मानसिकता चक्रावून टाकणारी आहे. असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून होत आहे.

       गेले दोन दिवस सर्वच प्रमुख स्टँड वर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. काल दि. २८ रोजी गडहिंग्लज स्टँड वर चंदगड कडे येण्यासाठी दोन - तीन गाड्या भरतील इतके प्रवासी दुपारपासून ताटकळत उभे होते. पण सायंकाळी ६-७ वाजेपर्यंत एकही गाडी नसल्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. यामुळे अनेकांची महत्त्वाची कामे खोळंबली तसेच शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. चंदगड तालुक्यातील कालकुंद्री- बेळगाव, कुदनूर, राजगोळी, कोवाड, कोल्हापूर-कोवाड अशा सर्व फेऱ्या बंद आहेत. आज मुस्लिम बांधवांचा मोहरम सण, त्यांनाही एसटी बंदचा मोठा फटका बसला आहे. 

    यासंदर्भात चंदगडचे आगार व्यवस्थापन विजयसिंह शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दोन्हीही भ्रमणध्वनी बंद येत होते. त्यामुळे त्याच्याशी संपर्क होवू शकला नाही. 

        यासंदर्भात चंदगड आगाराचे वाहतूक पर्यवेक्षक राज कारेकर यांच्याशी संपर्क साधला असता खालच्या भागात पाणी असल्यामुळे बऱ्याचश्या गाड्या बंद केल्या होत्या. त्याचबरोबर कॉलेजला सुट्टी असल्यामुळे बऱ्याचदा बंद होत्या. सोमवारपासून सर्व गाड्या सुरळीत सुरु होतील असे त्यांनी सांगितले.

 गतवैभव प्राप्त करून देण्याचे नवीन आगार व्यवस्थापकांपुढे आव्हान 

           २० वर्षांपूर्वी पर्यंत चंदगड एसटी डेपो महाराष्ट्रात उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्रात क्रमांक एकवर होता. तथापि विविध कारणामुळे उत्पन्न घटत गेले. मधल्या काळात १० वर्षांपूर्वी चंदगड आगाराचे व्यवस्थापक म्हणून सुनील जाधव यांनी आपल्या कामाचा ठसा प्रवासी व चंदगड तालुक्यातील जनमानसात उमटवला व आगाराला  बऱ्यापैकी गतवैभव प्राप्त करून दिले होते. त्यानंतर चार-पाच आगारप्रमुख तालुक्याला येऊन गेले पण या काळात आगाराची अधोगतीच होताना दिसली. सध्या एक महिन्यापूर्वी चंदगड साठी नवे आगार प्रमुख दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून चंदगड मधील ग्रामीण प्रवासी वर्गाला चांगल्या कार्याची अपेक्षा असून त्यांनी चंदगड आगाराला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान स्वीकारावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment