कर्यात भागात भात रोप लावणी अंतिम टप्प्यात - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2023

कर्यात भागात भात रोप लावणी अंतिम टप्प्यात

 

कोवाड (ता. चंदगड) येथील शिवारात भात रोप लावणी साठी चिखल करताना शेतकरी व रोपे लावताना शेतकरी महिला.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
    यंदा मृग व आर्द्रा नक्षत्राने ओढ दिल्यामुळे मान्सूनचा पाऊस सुमारे वीस दिवस उशिरा दाखल झाला. परिणामी पेरलेल्या भाताची उगवण उशिरा झाली. तसेच रोप लावणीही लांबणीवर पडली होती. चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील कर्यात भागातील कालकुंद्री, कुदनूर, कोवाड, कागणी, निट्टूर आदी गावांच्या परिसरात सध्या भात रोप लावणी अंतिम टप्प्यात आली आहे. 
      यंदा १२-१३ जुलै च्या दरम्यान सुरू झालेला झालेल्या पावसाचा जोर अधिकच वाढत गेल्यामुळे ताम्रपर्णी नदीच्या पुराचे पाणी शिवारात पसरले आहे. त्याचाही परिणाम भातरोप लावणी वर झाला असून आधी लावलेली भात रोपे गेले आठ-दहा दिवस पुराच्या पाण्याखाली असल्याने कुजण्याचा धोका वाढला आहे. लवकर पावसाने उघडीप न दिल्यास नदीकाठच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. कर्यात भाग पूर्वापर भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. तथापि शिवसेना शासन काळात कृष्णा खोरे विकास योजनेतून तालुक्यात २३ लघुपाटबंधारे प्रकल्प झाले. त्यापैकी सात ते आठ प्रकल्प याच भागात आहेत. मुबलक पाण्यामुळे आता भात पिकाऐवजी तसेच डोंगर उतार, माळरानावरही उसाचे पीक घेण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.     
      दुसरीकडे मजुरांची कमतरता, औत व खतांचे वाढलेले दर यामुळेही भात पिकाखालील जमीन कमी होताना दिसत आहे. असे असले तरी भात शेती बऱ्यापैकी तग धरून आहे. भागातील बहुतांशी शेतकरी कुरीच्या साह्याने धुळपेरणी करतात, उर्वरित शेतीतील भात रोप लावणी आता अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र दिसत असून ही कामे उरकण्याची शेतकऱ्यांची घाई सुरू आहे.


No comments:

Post a Comment