उच्च शिक्षणातील बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे - प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2023

उच्च शिक्षणातील बदलाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे - प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर

 

प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर बोलताना.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         "नवे शैक्षणिक धोरण स्वीकारणे आजच्या परिस्थितीत अपरिहार्य ठरले आहे.  शिक्षणात कौशल्य वृद्धीवर विशेष भर देण्यात आला आहे. कोठारी आयोगातील त्रुटी  दूर करण्यासाठी 1986 ला दुसऱ्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली. स्त्रिया आणि वंचितांच्या, प्रौढांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले गेले. सध्या शैक्षणिक  धोरणात लवचिकता आली असून त्यात सृजनशीलतेलाही वाव आहे. एवढे बदल घडूनही  शिक्षणावरचा ६ टक्के खर्च वाढवण्यात आला नाही, किंबहुना तेवढाही खर्च आपण शिक्षणावर करत नाही हे आजचे वास्तव आहे. कालौघात शैक्षणिक धोरणात बदल करण्याची गरज होती. भविष्यातील बरेच बदल हे स्वीकारले पाहिजेत. तथापि या बदलाकडे साशंकतेने पाहण्या ऐवजी नवे शैक्षणिक धोरण समजून घेणे गरजेचे आहे." असे प्रतिपादन  नेसरी येथील कोलेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांनी केले. 

        ते येथील र. भा.  माडखोलकर महाविद्यालयातील' राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व त्याची उच्च शिक्षणातील अंमलबजावणी'  या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य पी. आर. पाटील यांनी ``उच्च  शिक्षणाचे क्षेत्र नव्या शैक्षणिक धोरणामुळे पूर्णतः ढवळून निघाले आहे. बदलाच्या वाऱ्याला सामोरे जाऊन बदल समजून घेऊन आत्मसात करायला हवेत. या सर्व बदलांची अंमलबजावणी करत असताना नवीन पिढी व समाज उन्नत बनवण्यासाठी विवेकी पद्धतीने सर्वांनी कार्यरत राहावे.' असे मत व्यक्त केले.

       प्रास्ताविक  डॉ. एन. के पाटील यांनी केले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. आर. के. तेलगोटे यांनी कार्यशाळेचा  हेतू विषद केला तर एस. बी. दिवेकर यांनी आभार मानले. प्रारंभी वृक्षाला जलार्पण करण्यात आले. कार्यशाळेस  प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment