कागणी- राजगोळी रस्ता खड्डेमय...! पादच्यारांना येतोय रंगपंचमीचा अनुभव - चंदगड लाईव्ह न्युज

08 July 2023

कागणी- राजगोळी रस्ता खड्डेमय...! पादच्यारांना येतोय रंगपंचमीचा अनुभव

कालकुंद्री नजीक झालेली कागणी राजगोळी रस्त्याची दयनीय अवस्था.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कागणी ते राजगोळी खुर्द रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता खचल्यामुळे वाहन चालवणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. जागोजागी खड्ड्यांत साठलेले पाणी वाहनांच्या टायर मुळे उडून चालत जाणाऱ्या ग्रामस्थांना रंगपंचमीचा अनुभव येत आहे. पावसाळा वाढेल तशी रस्त्याची अवस्था गंभीर होणार असून यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ, वाहनधारक व प्रवासी वर्गातून होत आहे.

       कागणी ते राजगोळी हा रस्ता गडहिंग्लज, आजरा, नेसरी ते बेळगाव या राज्यमार्गाला जोडणारा आहे. या रस्त्यावर कागणी पासून पुढे कालकुंद्री, कुदनूर, तळगुळी, राजगोळी बुद्रुक, राजगोळी खुर्द अशी मोठ्या लोकसंख्येची गावे असल्यामुळे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. हा रस्ता राजगोळी पासून पुढे दड्डी, कळवीकट्टे ते हत्तरगी येथे पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. त्यामुळे गोवा, सिंधुदुर्ग, आंबोली, चंदगड कडून हत्तरगी, संकेश्वर, निपाणी, पंढरपूर कडे जाणारी अनेक वाहने या मार्गावरून जात असतात. गेल्या काही वर्षात राजगोळी परिसरात वाळू उत्खनन उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने येथून  बारमाही वाळू वाहतूक सुरू आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या बोजड वाहनामुळे पावसाळ्यात रस्ता खचून आणखी दयनीय होत आहे. ऊस गळीत हंगामात हेमरस, दौलत कारखान्याकडे जाणारे रोजचे शेकडो ट्रॅक्टर, ट्रक याच मार्गावरून जात असतात. इतक्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असूनही रस्त्याची दुरुस्ती तसेच रुंदीकरणाकडे संबंधित बांधकाम विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. याच रस्त्यावरील कालकुंद्री नजीक ओढ्याच्या दुतर्फा मोठ मोठाले खड्डे गेली तीन-चार वर्षे अपघातांना निमंत्रण देत आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच या मार्गावर केलेले डांबरी पॅचवर्क पहिल्याच रिमझिम पावसात गायब झाले आहे. एकंदरीत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तात्काळ उपाययोजना करावी व पावसाळा संपताच रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरण काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment