किल्लेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारकामुळे पारगडचा इतिहास जगासमोर येईल - श्रमिक गोजमगुंडे, मुसळधार पावसात पारगडवर स्मारकाचे भूमिपूजन - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2023

किल्लेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारकामुळे पारगडचा इतिहास जगासमोर येईल - श्रमिक गोजमगुंडे, मुसळधार पावसात पारगडवर स्मारकाचे भूमिपूजन

 

किल्लेदार रायबा मालुसरे यांची समजली जाणारी हनुमान मंदिर समोरील समाधी

चंदगड : सी एल वृत्तसेवा

        किल्लेदार रायबा मालुसरे यांचे स्मारक चंदगड तालुक्यातील पारगडवर होत आहे. या निमित्ताने सुभेदार रायबा उर्फ रायाजी मालुसरे, त्यांचे शूर मावळे व पारगड चा इतिहास जगासमोर येईल असे प्रतिपादन सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूरचे श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे (हुकूम) यांनी केले. ते पारगड किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या रायबा मालुसरे यांच्या संपन्न झालेल्या स्मारक भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. 

      सुनील मालुसरे, विलास मालुसरे आप्पाजी मालुसरे, सदाशिव मालुसरे यांनी स्वागत केले. रामचंद्र मालुसरे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी पुढे बोलताना गोजमगुंडे म्हणाले,  ``रायबा मालुसरे यांचा पारगडवरील पुतळा त्यांचा पहिलाच पुतळा असेल. सिंहगड लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजींचा पुत्र रायबा यांची पारगडचे पहिले किल्लेदार म्हणून नेमणूक केली. पाचशे मावळे दिमतीला देत 'सूर्य, चंद्र असेपर्यंत गड राखा..!' असा महाराजांनी दिलेला आदेश साडेतीनशे वर्षांनंतरही येथील मावळे जपत आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. स्मारकासाठी मालुसरे परिवाराने स्वमालकीची जागा देऊन सह्याद्री प्रतिष्ठानला बळ दिल्याचे त्यांनी सांगितले. 

किल्ले पारगड वर किल्लेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारक भूमिपूजन प्रसंगी उपस्थित सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर चे कार्यकर्ते शिवभक्त, दुर्गप्रेमी व ग्रामस्थ

       यावेळी रघुवीर शेलार बोलताना म्हणाले, ``गडावरील हनुमान मंदिरासमोर असलेली समाधी ही रायबा यांची आहे. अशीच समाधी तानाजी व सूर्याजी मालुसरे यांच्या गावी उमरठ येथे असून ती सूर्याजी यांची असल्याचे सांगितले. उमरठ, पोलादपूर येथे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शूर मराठा सरदार मालुसरे व शेलार यांच्या आम्हा वंशजांचा सन्मान केल्याची आठवण रघुवीर शेलार यांनी यावेळी सांगितली. यावेळी  सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गडावरील रघुवीर शेलार, धोंडीबा बेर्डे, प्रकाश चिरमुरे, रामचंद्र नांगरे आदींचा छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मान केला. मुसळधार पावसातही भूमिपूजन कार्यक्रमासाठी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर, दुर्ग जागर समितीचे कार्यकर्ते, शिवभक्त व दुर्गसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment