कालकुंद्री पाणवठ्यानजिक पुरात बुडालेली कागणी फिडरची डीपी दुरुस्त करताना वीज वितरण कंपनीचे कर्मचारी नागेश पाटील व अजित परीट.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
ताम्रपर्णी नदीला गेले चार-पाच दिवसापासून पूर आला आहे. किणी, कोवाड कर्यात परिसरात पुराची तीव्रता अधिक आहे. ताम्रपर्णी नदीकाठी कागणी गावठाण (ता. चंदगड) फिडरसाठी बसवलेली डीपी पुराच्या पाण्यात बुडाली आहे. या डीपीत बिघाड होऊन कागणी गावठाण फिडर वरील ८ गावांचा वीज पुरवठा गेले काही दिवस खंडित झाला होता. यामुळे होत असलेली विद्युत ग्राहकांची कुचंबणा टाळण्यासाठी वीज कंपनीचे दोन कर्मचारी जीवावर उदार होऊन बिघाड दुरुस्त करण्यासाठी सरसावले.
कोवाड - २ कार्यालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञ नागेश जानबा पाटील व बाह्यस्रोत कर्मचारी अजित सदाशिव परीट यांनी धाडसाने पण स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत बिघाड दुरुस्त केला. 11 KV लाईन पूर्ववत सुरू करुन आठ गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला. सध्या अनेक कर्मचारी ड्युटीच्या नावावर 'पाट्या' टाकताना दिसतात. अशा काळात स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रतिकूल परिस्थितीत खंडित वीज पुरवठा पूर्ववत सुरू केल्याने दोन्ही कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच ग्राहक वर्गातून कौतुक होत आहे. याकामी सहाय्यक अभियंता मगदूम, वायरमन राम शिराढोणे, युवराज कोकितकर, विलास कदम, नागनाथ नांदवडेकर, मारुती पाटील व कोवाड २ कार्यालय स्टाफचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment