चंदगड तालुक्यातील मटका, जुगार आदी अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी, जिल्हा अधीक्षकांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2023

चंदगड तालुक्यातील मटका, जुगार आदी अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी, जिल्हा अधीक्षकांना निवेदन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यामधील शिनोळी, देवरवाडी, हलकर्णी फाटा, पाटणे फाटा, चंदगड येथे चालु असलेला मटका जुगार अवैद्य दारू व्यवसाय कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी चंदगड तालुका राष्ट्रीय काॅँग्रसच्या वतीने कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

     निवेदनात म्हटले आहे की, ``चंदगड  पोलीस निरीक्षकांना चंदगड तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्या संदर्भात वारंवार माहीती व निवेदन देवून सदरचे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. महाविद्यालयीन आवारातच मटका व जुगार चालु असल्याने विद्यार्थी व बेरोजगार तरूण मोठया प्रमाणात याला बळी पडत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उधवस्त झाले आहेत. अलीकडेच वर्षभरापूर्वी ढोलगरवाडी गावातील ड्रग्स कोकेनचे प्रकरण ताजे असताना तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची मोठया प्रमाणात विक्री सुरू आहे. यामुळे राज्यपातळीवर व देश पातळीवर गावचे व तालुक्याचे नांव बदनाम होत आहे. 

         त्यामुळे आपण जिल्हा पोलीस प्रमुख या नात्याने सदर विषयात प्रत्यक्ष लक्ष घालुन सदर अवैद्य धंदे तातडीने बंद करण्यासाठी ठोस उपाय योजना करावी व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत. अन्यथा १४ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संदीप नांदवडेकर यांनी दिला आहे. यावेळी नितीन फाटक, संघर्ष प्रज्ञावंत उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस आयुक्त यांना पाठवण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment