मराठा सेवा संघाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा- मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

22 August 2023

मराठा सेवा संघाच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा- मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन


कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा

       मराठा बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अहोरात्र झटणाऱ्या 'मराठा सेवा संघ' संघटनेच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त माटुंगा मुंबई येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यास कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातील मराठा सेवा संघाचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महिपती बाबर, प्रवक्ते शहाजी देसाई आदींनी दिली आहे.

     शुक्रवार दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा (पश्चिम) मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते राज्य अध्यक्ष इंजि. विजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राजमाता जिजाऊ व शिवरायांच्या विचारांचा वारसा घेऊन सन १९८९ मध्ये स्थापन झालेल्या मराठा सेवा संघाच्या शाखा आता जगभर पसरल्या आहेत. ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात विविध क्षेत्रात  उत्तुंग यश मिळवलेल्या तसेच मराठा समाजाच्या उन्नतीसाठी कष्ट घेणाऱ्या नामवंत मराठा बंधू भगिनींचा सन्मान तसेच मराठा समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मराठा सेवा संघाने केलेल्या ३३ वर्षातील कार्याचा आढावा व आगामी काळातील कार्यक्रमाची दिशा ठरवली जाणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री ॲड. उज्वल निकम, माजी आमदार रेखाताई खेडेकर, सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, महासचिव चंद्रशेखर शिखरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गायकवाड, सतीश जोंधळे, भवानजी आगे-पाटील, राज्य कार्यकारणी पदाधिकारी संजय निकम, रवींद्र जाधव, अमरदीप गरड, संतोष शेलार, विशाल देशमुख, मुकुंद हातोटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी निर्मलकुमार देशमुख राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातून मराठा सेवा संघ कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment