नागपंचमीला पाळणा देण्याची चंदगड तालुक्यातील आगळी - वेगळी प्रथा - चंदगड लाईव्ह न्युज

21 August 2023

नागपंचमीला पाळणा देण्याची चंदगड तालुक्यातील आगळी - वेगळी प्रथा

 


तेऊरवाडी / एस. के. पाटील

        श्रावण महिण्यातील पाहिला येणार सण म्हणजे नागपंचमी. सर्वाधिक खाद्य पदार्थ खायला मिळणाऱ्या या सणामध्ये नवीन लग्न झालेल्या वधू च्या घरी वराच्या घराकडून सजवलेला लहान पाळणा पाठवण्याची आगळी -वेगळी  परंपरा चंदगड तालुक्यात अजूनही टिकून आहे.

      नाग पंचमीचा सण चंदगड तालूक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या चंदगड तालूक्यात गेल्या शेकडो वर्षापासून अनेक पारंपारिक प्रथा अजूनही जपल्या जात आहेत. प्राचीन संस्कृतीचा वारसा आजही जपला जात आहे. या पंचमीच्या सणाला अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ बनवले जातात. यामध्ये  वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चिवडा, पोहे, भिजाने, लाह्या, उंडा, अळूचे फतफते आदिंचा यामध्ये समावेश होतो. याच दिवशी झाडाला पाळणे बांधून झोका घेणे, बेल्ले फिरणे, नागाची पूजा करणे यासारखे कार्यक्रम घेतले जातात. 

     या सर्वामध्ये मातीच्या तेलतेव्यामध्ये चूलीवर केला जाणारा उंडा अन जोंधळा (दूध मोगरा) च्या केल्या जाणाऱ्या लाह्या सर्वांचा आवडीचा विषय. अबाल वृद्ध या सर्व खाद्य पदार्थां चा मनसोक्त आस्वाद तर घेतातच. पण हे सर्व पदार्थ एकमेकांच्या घरी भेट म्हणून सुद्धा देतात. या बरोबरच ज्यांच्या घरी मुलाचे लग्न झाले आहे. त्यांच्या घरातून विवाह होऊन आलेल्या मुलीच्या घरी पाळणा पाठवण्याची प्रथा आहे. यामध्ये प्रतिकात्मक छोटा पाळणा वापरला जातो. हा पाळणा खूप छान पैकी सजवला जातो. यासाठी फूलांचा वापर केला जातो. पाळण्याच्या खाली चार खुराना  व मध्यभागी प्रत्येकी पाच नारळाचे बेल्ले वापरले जातात. मध्ये नारळ व पाणाचा विडा ठेवला जातो. सोबत बनवलेल्या सर्व खाद्य पदार्थाची सुंदर अशी दूरडी सजवली जाते. हे घेऊन नववधूच्या घरी देण्यात येते. तेथेही दुरडी घेऊन जाणाऱ्यांचा भव्य असा मानपान देऊन पाहूणचार केला जातो. अशा या आगळ्या वेगळ्या प्रथा चंदगड तालूक्यात आजही जपल्या जात आहेत. नवीन पिढीकडे संस्कृतिचा हा अमूल्य ठेवा हस्तांतरित केला जात.

No comments:

Post a Comment