आमदार सतेज पाटील |
कोल्हापूर : सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दिनांक ३ सप्टेंबर २०२३ पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. या जनसंवाद यात्रेत आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार श्रीमती जयश्री जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. याच धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यभरात ३ सप्टेंबर पासून ही जनसंवाद पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी ३ सप्टेबर रोजी चंदगड येथून सकाळी ७.३० वाजता या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. लोक भावना जाणून घेणे हा यात्रेचा मुख्य हेतू आहे. यात्रे दरम्यान महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत लोकांशी संवाद साधला जाणार आहे.
यात्रेत जिल्ह्यातील माजी आमदार, प्रदेश व जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, माजी नगरसेवक-नगरसेविका, माजी जिल्हा परिषद सदस्य-सदस्या, माजी पंचायत समिती सदस्य- सदस्या, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य - सदस्या, महिला आघाडी, जिल्हा युवक काँग्रेस, विविध सेलचे पदाधिकारी यांचा समावेश असेल. तरी या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
कसे असेल जनसंवाद यात्रेचे स्वरुप
१) प्रत्येक दिवशी यात्रेचा सकाळचा टप्पा आणि दुपारचा टप्पा असे दोन टप्पे असतील. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी जाहीर सभा होतील.
२) तसेच दोन टप्प्याच्या मधल्या वेळेत कार्यकर्त्यांशी विविध विषयांवर संवाद साधला जाणार आहे. त्या-त्या तालुक्यातील समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.
No comments:
Post a Comment